दैनिक स्थैर्य | दि. २२ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महविद्यालय, फलटण येथे शुक्रवार दि. २४ फेब्रुवारी रोजी ‘कुरूक्षेत्र २०२३’ या राज्यस्तरीय टेक्निकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विविध विभागांमध्ये एकूण २४ स्पर्धा प्रकार होणार असून त्यामध्ये सुमारे एक हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे.
महाविद्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या या स्पर्धेचे हे ७ वे वर्ष आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्य रुजविण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा उपयोगी ठरतात. स्पर्धेच्या या युगामध्ये कौशल्याधारित शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. जी. नार्वे यांनी केले आहे.
येथील निमकर अॅग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर, पद्मश्री डॉ. अनिल राजवंशी यांचे मार्गदर्शन यावेळी उपस्थित स्पर्धकांना मिळणार आहे. डॉ. अनिल राजवंशी गेली अनेक वर्ष विविध संशोधनाच्या माध्यमातून खेड्यातील नागरिकांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहेत. सन २०२२ सालचा विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार देत भारत सरकारच्या वतीने त्यांच्या विविध संशोधनांचा गौरव केला आहे.
कृतिशील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना होणार आहे, ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब असल्याचे गौरवोद्गार फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
शुक्रवार दि. २४ रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन झाल्यानंतर स्पर्धेला सुरुवात होईल. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत परिक्षण केले जाईल व सायंकाळी ४.३० वाजता बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी अभियांत्रिकी महाविद्यालय समितीचे चेअरमन श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर तसेच सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, ला. भोजराज नाईक निंबाळकर, हेमंत रानडे, शिरीष दोशी, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, शिरीष भोसले, अरविंद शहा (वडूजकर), प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, अधीक्षक श्रीकांत फडतरे उपस्थित रहाणार आहेत.
या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे सामंजस्य करार असणार्या विविध कंपन्या, बिल्डर्स असोसिएशन फलटण, क्रेडाई फलटण, लायन्स क्लब फलटण या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी विविध महाविद्यालयांतील प्राचार्य यांना आमंत्रित करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास १००० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.