दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
मलठण (ता. फलटण) येथील काळुबाई नवरात्र उत्सव मंडळ, काळुबाईनगर मंडळाच्या वतीने दि. १५ ऑटोबर ते २४ ऑटोबरदरम्यान सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा शुभारंभ घटस्थापनेपासून होणार असून रोज संध्याकाळी ७ वाजता कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या उत्सवादरम्यान दि. १६ ऑक्टोबर रोजी महिलांचे सांस्कृतिक खेळ, दि. १७ रोजी श्री तुळजाभवानी सांप्रदायिक आराधी मंडळाचा कार्यक्रम, १८ ऑक्टोबररोजी ‘हास्यनगरी’ प्रा. रवींद्र कोकरे सर यांचे प्रबोधन, दि. १९ रोजी जानाई सांप्रदायिक भारूड मंडळ राजाळे यांचा कार्यक्रम, २० ऑटोबर रोजी काळुबाईनगर महिला दांडिया ग्रुप, २१ रोजी जय तुळजाभवानी दांडिया ग्रुप फलटण, २२ ऑटोबर जय तुळजाभवानी दांडिया ग्रुप व शिवशंभो दांडियाचा कार्यक्रम, २३ रोजी शिवशंभो दांडिया ग्रुप, मलठण यांचा कार्यक्रम व दि. २४ ऑक्टोबर रोजी काळुबाई पालखी सोहळा सायंकाळी ७ वाजता निघेल.
हा पालखी सोहळा पारंपरिक वाद्यांच्या गजरात पार पडेल. दरम्यान, रोज रात्री ८ वाजता महाआरती करण्यात येईल.
या सर्व कार्यक्रमांसाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली महिलांची उत्सव समिती स्थापन करण्यात आली असून सर्व महिला हा उत्सव पार पाडणार आहेत. त्यास सर्व पदाधिकार्यांची साथ असणार आहे.
या सर्व कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या पदाधिकार्यांनी केले आहे.