दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑक्टोबर २०२३ | बारामती |
महावितरण कंपनीमधील तांत्रिक कामगारांचे मुख्यालय पातळीवर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत व त्यातील अंमलबजावणी होणे बाकी असलेल्या प्रश्नांसाठी व आवश्यक साहित्यासाठी (मटेरियलसाठी) विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने बारामती ग्रामीण मंडलच्या वतीने ऊर्जा भवन, बारामती येथे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी बाळासाहेब गायकवाड केंद्रीय उपाध्यक्ष, कल्याण धुमाळ सचिव, पुणे प्रादेशिक, दत्तात्रय माहूरकर सचिव, बारामती परिमंडळ तसेच शरण बसप्पा सोनकांबळे, ज्ञानेश्वर सावंत, धनाजी तावरे, राजेंद्र देहाडे, जैनुद्दीन आतार, मच्छिंद्र बारवकर, गोरख बारवकर, राजेंद्र झिंजाडे, आनंत सावंत, सचिन माने आदी पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महावितरणचा लाईन स्टाफ स्वतःचे दुचाकी वाहन कंपनीच्या गतिमान सेवेसाठी मागील अनेक वर्षापासून वापरत आहे. मात्र, त्याला प्रत्यक्ष फिरण्यासाठी जेवढे इंधन मिळणे आवश्यक आहे ते दिले जात नाही. जाणीवपूर्वक निर्माण केलेली कारागीर ब, क, मीटर टेस्टर १, २, ३ आणि प्रधान व वरीष्ठ यंत्रचालक यांची उच्यपदाच्या लाभाची विसंगती दूर करण्याचे मान्य केले आहे, पण अंमलबजावणी केली जात नाही. मार्च २०१९ नंतरची उपकेंद्र खाजगी ठेकेदारांना चालविण्यास दिली आहेत. त्याठिकाणी नियमित कर्मचारी देण्याबाबत मान्यता दिली. मे महिन्यात चर्चा होत असताना एका महिन्यात अंमलबजावणी करण्याचे मान्य केले, त्याची अंमलबजावणी अद्याप नाही.
कर्मचार्यांवरील खर्च कमी करण्याच्या उद्देशाने महावितरण मागील १० वर्षापासून सहाय्यक पद्धतीने भरती प्रक्रिया राबविली जात आहे. नियमित कर्मचारी यांचे पगारवाढी सोबतच त्यांना मानधन वाढविले जाते. मात्र, कंपनी नियमित कर्मचारी यांना मागील फरकासह पगारवाढ लागू करते, मात्र सहाय्यकांना कराराच्या तारखेच्या पुढे वाढ लागू करते. म्हणून नियमित कर्मचार्यांचे सोबत त्यांचे मानधन १/४/२०२३ पासून वाढवावे, यावर १२ मे रोजी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्तरावर बैठक देखील झाली. त्यांनी प्रस्ताव सादर करण्यास सूचना दिल्या होत्या, त्यावर कोणतीच कार्यवाही नाही. पदोन्नतीसोबत विनंती बदल्या कराव्यात व फिल्डवर काम करताना लागणारे आवश्यक मटेरियल, व टी अँड पी मिळत नाही, त्याबाबत अडचणी दूर कराव्यात, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.