दैनिक स्थैर्य । दि. १६ मे २०२३ । सातारा । नैसर्गिक आपत्ती विषयी लोकांमध्ये जनजागृती करुन दरडीसारख्या आपत्तीपूर्वी होणाऱ्या बदलांची माहिती लोकांना द्यावी. याबाबत कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा अपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची मान्सून पूर्वतयारी 2023 आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांच्यासह जिल्ह्यातील संबंधित विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
दरड कोसळण्यापूर्वी पाणी गढूळ होणे, जमिनीला भेगा पडणे, झाडे व खांब वाकणे अशी लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे दिसल्यास ग्रामस्थांनी गाव सोडावे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री.जयवंशी म्हणाले, दरड प्रवण गावांच्या पुनर्वसनासाठी भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी. सिंचन मंडळांकडील जमिनींचा प्रस्ताव तातडीने पाठवावा. सर्व विभागांकडील नियंत्रण कक्ष 24 तास नियमितपणे सुरु राहतील याची दक्षता घ्यावी. शासनाकडुन प्राप्त झालेले सॅटेलाईट फोन पाटण व महाबळेश्वर तालुक्यात प्राधान्याने पुरविण्यात यावे. जलसंधारण विभागाने तलाव फुटुन नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. आपत्ती काळात नागरिकांना सतर्क करण्यासाठी पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टिम उभारावी. महावितरणने वाई ते महाबळेश्वर भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यासाठीचा प्रस्ताव द्यावा. नदी काठावरील शेतीपंप काढून घेण्याबाबत सूचना द्याव्यात. पाटबंधारे विभागाने आपत्ती व्यवस्थापनासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती द्यावी. पोलीस विभागाने पुरामूळे पुल पाण्याखाली गेल्यास दोन्ही बाजूस पोलीस तैनात करावेत. मान्सून काळात नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होईल याकडे मुख्याधिकारी व गट विकास अधिकारी यांनी लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी सर्व विभागांनी आपत्ती व्यवस्थापनाचा सर्वसमावेशक आराखडा 20 मे पर्यंत सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच तालुका पातळीवर आपत्ती व्यवस्थानाबाबत बैठका घ्याव्यात, घाट क्षेत्रात अडथळा दूर करण्यासाठी जेसीबी, पोकलेन, क्रेन, डंपर इ. वाहने तात्काळ उपलब्ध करुन द्यावीत. साथीच्या रोगाबाबत पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. धरण निहाय स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. पूर व अतिवृष्टीच्या काळात विद्युत वाहिन्या तुटणे, खांब पडणे, गावात पाणी शिरणे अशा काळात तातडीने वीज पुरवठा खंडीत करणे व सेवा सुरळीत करणे यासाठी स्वतंत्र पथक नेमावे. शहरातील व गावातील गटार व नाले सफाई करावी. पूरामुळे संपर्क तुटणाऱ्या व अतिदुर्गम भागातील गावांमध्ये तीन महिने पुरेल इतका अन्न-धान्य साठा व रॉकेल साठा उपलब्ध करुन घ्यावा. स्थलांतराची ठिकाणे सुस्थितीत ठेवावीत. मान्सुनपूर्वी जनावरांचे लसीकरण पूर्ण करावे. स्थलांतरासाठी आवश्यक असणारी वाहने एस टी विभागामार्फत व गरज पडल्यास खाजगी वाहने उपलब्ध होतील याची दक्षता प्रादेशिक परिवहन विभागाने घ्यावी अशा सूचनाही श्री. आवटे यांनी केल्या.
सुरुवातीस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. ताम्हाणे यांनी जिल्ह्यातील पाऊस, नद्या, धरणे यांची माहिती दिली. जिल्ह्यात 172 पूर प्रवण गावे असून 124 दरड प्रवण गावे आहेत. 91 पर्जन्यमापक केंद्रे असून 6 घाटांमध्ये दरड कोसळते. 500 स्वयंसेवकांना आपत्ती प्रशिक्षण देण्यात आले असून स्थलांतरासाठी 47 तात्पुरती शेल्टर उभारण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच शासनाकडून 8 सॅटेलाईट फोन व आपत्ती काळात नागरिकांच्या स्थलांतरासाठी 4 मीटर बाय 4 मीटरचे 4 व 5 मीटर बाय 10 मीटरचे 8 असे एकूण 12 टेंट प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले.