लोणंदमध्ये १५ ते २२ ऑक्टोबरदरम्यान लोणंद फेस्टीव्हलचे आयोजन

नवरात्रीत प्रत्येक दिवशी नवदुर्गा पुरस्काराने होणार एका महिलेचा सन्मान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० ऑक्टोबर २०२३ | फलटण |
नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचा आणि स्त्रीशक्तीच्या गौरवाचा सण. वेगवेगळ्या क्षेत्रात स्वत:चे अढळ स्थान निर्माण करणारी आजची स्त्री सामाजिक बदलांसाठीही ठामपणे उभी राहते आहे. लोणंदकरांसाठी ‘लोणंद वूमन बाईक रॅली’च्या माध्यमातून मागील दोन वर्षांपासून गुढीपाडव्याच्या दिवशी यशस्वी बाईक रॅली काढून महिलांना प्रोत्साहित करण्यात आले आहे.

या वर्षांपासून नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने लोणंद फेस्टिवलचे आयोजन दि. १५ ते २२ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले आहे. दररोज रात्री ८ ते १० पर्यंत हजारो नागरिकांना एकाच वेळी दांडिया व गरबा खेळण्याची संधी यामाध्यमातून लोणंदकरांना उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच स्त्रीशक्तीचा सन्मान व्हावा यासाठी ‘शोध नवदुर्गाचा’ या उपक्रमाद्वारे. समाजातल्या नऊ कर्तृत्ववान स्त्रियांचा शोध घेऊन दररोज एका महिलेस गौरविण्यात येणार आहे.

तुमच्या आमच्यातल्याच या स्त्रीशक्तीला समाजापुढे आणण्याचा आणि तिच्या कर्तृत्वाला सलाम करणे, हा या उपक्रमाचा हेतू आहे. याचबरोबर लोणंद नगरपंचायतीच्या वतीने पर्यावरण रक्षण, बेटी बचाव, बेटी पढाव अभियान, पोलीस स्टेशन अंतर्गत महिला दक्षता समितीच्या वतीने महिलांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती अभियान व दांडिया ग्रुपला बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.

लोणंद फेस्टिव्हलच्या माध्यमातून नागरीकांना गरबा, दांडिया खेळण्यातून आनंद मिळणार असून जनजागृतीही होणार आहे. या महोत्सवात संस्कृतीचे जतन होण्याबरोबरच धार्मिक सलोखा राखण्याचे कार्य होणार असून लोणंदकरांसाठी हा एक महोत्सव होणार असल्याने या लोणंद फेस्टिव्हलमध्ये खंडाळा, फलटण तालुक्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेला दर्शना रावळ, डॉ. स्वाती शहा, शैलजा खरात, प्रज्ञा खरात, प्राजित परदेशी उपस्थित होते.

या फेस्टीव्हलसाठी टाटा कंपनी यांनी प्रायोजकत्व स्वीकारले असून लोणंद नगरपंचायत, लोणंद पोलीस स्टेशन, रोटरी क्लब लोणंद, इनरव्हील क्लब लोणंद, लोणंद पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या सर्व पोलीस पाटील व लोणंदमधील प्रतिष्ठीत व्यावसायिक यांचे सहकार्य लाभले आहे.


Back to top button
Don`t copy text!