दैनिक स्थैर्य । दि. १३ डिसेंबर २०२२ । मुंबई । मुंबईत 13 ते 16 डिसेंबर 2022 दरम्यान होणाऱ्या जी-20 विकास कार्यगटाच्या बैठकीबाबत जी 20 चे शेर्पा अमिताभ कांत यांनी आज प्रसारमाध्यमांना माहिती दिली आणि विकास कार्यगटाच्या बैठकीमधील भारताचे प्राधान्यक्रम आणि दृष्टीकोन यांचा आराखडा सादर केला.
2010 पासून जी-20च्या विकासविषयक जाहीरनाम्याचे ताबेदार म्हणून विकास कार्यगट काम करत आहे. शाश्वत विकास आणि त्याची उद्दिष्टे याबाबतच्या 2030च्या जाहीरनाम्याचा 2015 मध्ये स्वीकार केल्यानंतर विकास कार्यगटाने शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांनुरुप जी-20च्या विकासाच्या जाहीरनाम्याला आकार दिला आहे. त्यांच्या कामाचे स्वरुप विचारात घेता विकास कार्यगटाने गेल्या एका दशकात अध्यक्षीय प्राधान्यक्रमानुसार अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या मुद्यांची हाताळणी केली आहे.
सध्याच्या काळात जगाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण केवळ एकत्र काम करण्यानेच शक्य आहे यावर श्री. कांत यांनी भर दिला. आमच्या प्राधान्यक्रमांमध्ये केवळ जी-20 सदस्यांच्याच आकांक्षाचा समावेश नसून जगाच्या दक्षिणेकडील देशांच्या आकांक्षांचाही समावेश आहे. एका समावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती आधारित दृष्टीकोनाचा भारत पाठपुरावा करत आहे. भारताच्या विकास कार्यगटाच्या प्राधान्यक्रमांचा आराखडा श्री. कांत यांनी सादर केला. यामध्ये 1) हवामानविषयक कृती आणि अर्थसाहाय्यासह न्याय्य ऊर्जा संक्रमण आणि ‘लाईफ’( पर्यावरण पूरक जीवनशैली), 2) शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना गती देणे आणि 3) डिजिटल सार्वजनिक सामग्री/ विकासाकरिता डेटा यांचा समावेश आहे. कर्जाचे ओझे, सुधारित बहुराष्ट्रवाद आणि महिला-प्रणीत विकास या मुद्यांचा देखील विकास कार्यगटाच्या बैठकीत समावेश असेल आणि भारत समावेशक विकासाचे आणि तो साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या सामूहिक कृतीचे महत्त्व अधोरेखित करेल , अशी माहिती श्री. कांत यांनी दिली.
भारताच्या अध्यक्षतेखाली आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी सामूहिक कार्याला प्रोत्साहन, बहु-आयामी संशोधन आणि जोखीम कमी करण्यासाठीच्या सर्वोत्तम पद्धतींची परस्परांमध्ये देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने एका नव्या कार्यप्रवाहाची स्थापना करण्यात आल्याची आठवण श्री. कांत यांनी करून दिली.
याशिवाय झपाट्याने बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीमध्ये आवश्यक असलेला प्रतिसाद म्हणजेच नवोन्मेषाला चालना देणारे बळ म्हणून स्टार्ट अप्सचे महत्त्व लक्षात घेणारा नवा स्टार्टअप संवाद गट स्थापन करण्यात आला आहे.
या तीन दिवसीय बैठकीमध्ये शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना गती देण्यासाठी जी-20 च्या एकत्रित कृतीवर, विकसनशील देशांच्या अन्न आणि उर्जा सुरक्षेशी संबंधित समस्यांची तातडीने हाताळणी करण्यासाठी पाठबळ देण्यावर, कर्जामुळे पडलेल्या बोज्याच्या संकटाचा मुद्दा आणि शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांसंदर्भात 2023 मध्ये नवी दिल्लीतील अद्ययावत माहिती यावर देखील भर दिला जाणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही राज्य सरकारच्या सहकार्याने करण्यात आले आहे. त्याशिवाय या बैठकीला आलेल्या प्रतिनिधींसाठी मुंबईत कान्हेरी गुंफांमध्ये एका अभ्यास सहलीचे देखील आयोजन करण्यात आले आहे.