दैनिक स्थैर्य | दि. ५ ऑगस्ट २०२४ | फलटण |फलटण येथील जोशी हॉस्पिटल प्रा. लि. तर्फे ‘आपली फलटण मॅरेथॉन २०२४’ स्पर्धेचे दि. 10 नोव्हेंबर 2024 रोजी सजाई गार्डन, फलटण येथे आयोजन केले आहे.
जोशी हॉस्पिटल प्रा. लि. आणि फलटण रोबोटिक्स सेंटरच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त मॅरेथॉनचे आयोजन रविवार, दि. 10 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी ६ वाजता सजाई गार्डन मंगल कार्यालय, फलटण येथे करण्यात येत असल्याचे निमंत्रक डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त जोशी हॉस्पिटल गेल्या ९ वर्षांपासून अनोख्या व आगळ्यावेगळ्या पध्दतीने हा दिन साजरा करत आहे.
मानवी जीवन आनंदी व समाधानी असावे, त्यासाठी निरोगी मनाची आणि निरोगी मनाच्या वास्तव्यासाठी निरोगी शरीराची आवश्यकता असते. शरीर निरोगी ठेवण्यात आहार व व्यायाम यांचा मुख्य वाटा असून देशाच्या जडणघडणीत युवकांचे योगदान महत्त्वाचे असल्याने युवा पिढीला समजावून घेवून त्यांच्याशी सुसंवाद प्रस्थापित करणे हे सामाजिक कर्तव्य असून जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉनचा कार्यक्रम हा त्यादृष्टीने खारीचा वाटा असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी स्पष्ट केले.
२५ ते ७५ वर्षे वयोगटातील सर्वांना व्यायामाचे महत्त्व समजावून देणे व प्रबोधन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
गेल्या २४ वर्षांपासून फलटण येथे कार्यरत असताना अस्थिरोग उपचार, सांधेरोपण शस्त्रक्रिया आणि मणक्यांवरील शस्त्रक्रिया करून अविरत उपचार देणे चालूच आहे. सदरचे पेशंट आमच्या कुटुंबाचा एक भाग असल्याने सर्वांनी एकत्र यादि. 10 नोव्हेंबर 2024 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. प्रसाद जोशी यांनी केले आहे.
या मॅरेथॉनसाठी यावर्षी प्रमुख पाहुण्या म्हणून मुंबई पोलीस दलाच्या पहिल्या महिला कमिशनर, अॅडव्होकेट आणि आयपीएस ऑफिसर सौ. मीरा बोरवणकर चढ्ढा या उपस्थित राहणार आहेत.
त्याचबरोबर एशियन गेम्स चॅम्पियन आणि ऑलिम्पिक मेडलिस्ट ललिता बाबर यासुद्धा उपस्थित राहणार आहेत. यावेळी महिलांचा सहभाग जास्त अपेक्षित असून महिलांचे सबलीकरण आणि सशक्तीकरण यावर सौ. मीरा बोरवणकर खास मार्गदर्शन करणार आहेत.
आकर्षक बक्षिसे आणि उत्तम नियोजन हे ‘आपली फलटण मॅरॅथॉन’चे आत्तापर्यंतचे वैशिष्ट्य ठरले आहे. या मॅरेथॉनसाठीचे रजिस्ट्रेशन होणार आहे, असे डॉ. प्रसाद जोशी यांनी सांगितले.
हे रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीने www.joshihospitalpvtltd.com या वेबसाईटवर करता येईल.
१५ ऑगस्ट २०२४ रोजी मॅरेथॉनची सर्व माहिती सांगितली जाईल आणि ती आपण वरील वेबसाईटवर सुद्धा पाहू शकणार आहात.