दैनिक स्थैर्य । दि.१५ नोव्हेंबर 2021 । सातारा । शेतकऱ्यांना थकबाकीचे ऊस बिल अदा करावे, श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कारखाना प्रशासनाला शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम व्याजासह अदा करण्याचे आदेश द्यावेत ती रक्कम अदा न केल्यास संबंधित कारखान्यावर कारवाई करावी, तसे न झाल्यास येत्या तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे देण्यात आल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष अजित बानुगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अजित बानुगडे पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील न्यु फलटण शुगर वर्क्स लि, साखरवाडी हा साखर कारखाना सन १९५९ सालापासून कार्यान्वित झाला आहे. सन २०१७-१८ साली या कारखान्याने एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांचे उसाचे बिल अदा करण्याचे मान्य केले होते. मात्र सन २०१८-१९ चा गळीत हंगाम या साखर कारखाने सुरू केला नाही. कारखाना प्रशासनाने तब्बल ४७ कोटी ८६ लाख, ९८ हजार रुपये एवढी ऊसाची एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना वरील कालावधीत अदा केलेली नाही. दरम्यानच्या काळात साखर कारखान्याचे विलीनीकरण करण्याबाबत निविदा काढण्यात आली.
फलटणचे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाने या कारखान्याकडून शेतकऱ्यांची थकीत ऊस बिलाची किती रक्कम अदा होणे बाकी आहे असा अहवाल घेतला. दुसरीकडे न्यू फलटण शुगर वर्क्स या कारखानाची कवडीमोल रकमेला म्हणजेच ५० कोटीला बेकादेशीर विक्री करण्यात आली. हा कारखाना श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी खरेच केला. हा कारखाना खरेदी करताना जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना शेतकऱ्यांची थकित एफआरपीची रक्कम अदा करण्याची अट घातली होती. मात्र कारखाना प्रशासनाकडून अद्याप रक्कम अदा केली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
केंद्र शासनाच्या शुगर कंट्रोल ऑर्डरच्या तरतुदीप्रमाणे शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा न केल्यास कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर असते. त्यामुळे आपण संबंधित कारखान्याला शेतकऱ्यांची थकीत रक्कम तात्काळ व्याजासह अदा करण्याच्या सूचना देऊन संबंधित कारखान्यावर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
यावेळी शंभूराज खलाटे, अरविंद पिसे, शिवाजीराव चव्हाण, महेश शिंदे आदी उपस्थित होते.