
स्थैर्य, मुंबई, दि.१५: राज्याचे सामाजीक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केल्यानंतर विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी 2019 च्या निवडणूक अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दुसऱ्या बायको आणि मुलांचा उल्लेख केला नाही, असा आरोप विरोधकांकडून होत आहेत. यातच, भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार अतुल भातखळकर यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रारही केली आहे. या प्रकरणातवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवडणूक अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात लग्नासंदर्भातील माहिती दडवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्या आरोपाच्या संदर्भाने बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘हमाम मे सब नंगे है’ याचे भान विरोधी पक्षाने ठेवावे. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये. हा मंत्र सर्वांसाठी लागू आहे,’ अशा शब्दात राऊतांनी भाजप नेत्यांना इशारा दिला.
शरद पवारांचा भाजपला टोला
धनंजय मुंडेंबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, शपथपत्रात मुंडेंनी माहिती लपवली की नाही हे पाहावे लागेल. त्यातील काही तांत्रिक गोष्टी बघाव्या लागतील. देशात अशाप्रकारच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. देशातील सर्वोच्च प्रमुखांबाबतीतही अशा गोष्टी झाल्या आहेत. त्याच्या खोलात जाण्याची गरज नाही. सत्ता हातून गेल्याने काहीजण अस्वस्थ झाले आहेत,’ असा टोला पवारांनी लगावला.