स्थैर्य, मुंबई, दि.२८: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस बजावली आहे. यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, आज स्वतः संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजवर जोरदार हल्लाबोल चढवला. ‘आमच्या 22 आमदारांना ईडीची नोटीस पाठवून राज्यातील सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव आहे’, असा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे.
संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, ‘भाजपच्या या हस्तकांनी मला 22 आमदारांची यादी दाखवली होती. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची नावे होती. या आमदारांवर ईडीचा दबाव आणून त्यांचे राजीनामे घेतले जाईल आणि सरकार पाडले जाणार असल्याचे मला सांगण्यात आले होते. प्रताप सरनाईक हे फक्त टोकन आहेत. आम्ही सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही, असे या हस्तकांनी सांगितल्याची माहिती राऊत यांनी दिली.
‘विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही तेव्हा त्यांना पोलिस, ईडी, सीबीआयसारख्या हत्यारांची गरज पडते. फक्त भडास काढण्यासाठी सीबीआय, ईडीचा वापर सुरु आहे. पण ईडीची नोटीस आमच्यासाठी मोठा विषय नाही. आम्ही ईडीला नोटीसला घाबरत नाही. आमच्यापैकी कोणी काहीही चुकीचे केले नाही’, असेही राऊत म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले की, ‘कालच मी देवेंद्र फडणवीसांचे ऐतिहासिक विधान ऐकले. काही केले नसेल तर घाबरायचे कशाला ? नोटीस म्हणजे काय ब्रह्मवाक्य आहे का? मी परत सांगतो, आमच्यातील कुणी काहीही केले नाही. नोटीस येऊद्या किंवा नाही येऊ द्या. आम्ही घाबरत नाही, असे राऊत म्हणाले. तसेच, ‘बाहेरच्या व्यक्तीला ईडी कार्यालयात प्रवेश मिळत नाही. पण, 3 महिन्यांपासून भाजपचे लोक या कार्यालयात चकरा मारत आहेत. भाजपचे तीन नेते तिथून कागदपत्र काढतात आणि ते माहिती लीक करतात,’ अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
‘मागील एका वर्षापासून भाजपचे महत्त्वाचे नेते आणि हस्तक मला सातत्याने भेटण्याचा प्रयत्न करत आहते. सरकार टिकवू देऊ नका. सरकारच्या मोहात पडू नका. आम्ही सरकार पाडण्याची तयारी झाली आहे, असे मला सांगत आहेत. तसेच, आमच्याकडे ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग आहे, आम्ही तुम्हा सर्वांना टाईट करणार आहोत, अशा प्रकारे मला धमकावले जात आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली.