विरोधी पक्षनेत्यांचे दौरे, बैठकांना हजर राहण्यास सरकारी अधिकाऱ्यांना मनाई


स्थैर्य, मुंबई, दि. २१ : राज्याच्या विधानसभा आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेत्यांना बैठका बोलावण्याचा अधिकार नाही, त्यामुळे त्यांनी बोलावलेल्या बैठकांना आणि दौऱ्यांना सरकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये, असा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या एका शासन निर्णयात काढण्यात आला आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कोव्हिड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू आहे. यादरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने एक परिपत्रक काढलं आहे.

केवळ मंत्र्यांनाच प्रशासकीय कामावर लक्ष ठेवणे, अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे व त्यांना सूचना देणे याबाबत अधिकार आहेत, त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकांमध्ये सहभागी होऊ नये, जिल्ह्यातील खासदार किंवा आमदारांना प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक आयोजित करायची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना या प्रश्नांची यादी त्यांच्याकडून घेऊन संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी, असं परिपत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली. विरोधी पक्षनेते हे घटनात्मक पद असल्यामुळे अशा प्रकारे मुस्कटदाबी करणं योग्य नाही. हा म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे, असं दरेकर म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!