वारीच्या वाटेवर – लोकसाहित्यकार : शांतिब्रह्म एकनाथ महाराज

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ जुलै २०२२ । फलटण । महाराष्ट्रातल्या भागवत धर्माची वाटचाल सांगणारा संत बहिणाईचा प्रसिध्द अभंग सर्वांच्या माहितीचा व पाठातला आहे…
ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया
नामा तयाचा किंकर, तेने केला हा विस्तार
जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत
तुका झालासे कळस, भजन करा सावकाश.

बहिणाईने संतांच्या विचार यात्रेची संपूर्ण प्रक्रिया या चार ओळींमध्ये गोठवून ठेवली आहे. या अभंगात ज्या चार संतांचे वर्णन आहे त्यांचे काम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. यातील एकनाथ महाराजांच्या चरित्राचा थोडक्यात मागोवा घेण्याचा हा प्रयत्न आहे. एकनाथ महाराज हे मराठी संत मंडळातील अनन्यसाधारण असं व्यक्तित्व आहे. नाथांनी भागवतावर आधारित जे ‘एकनाथी भागवत’ लिहिले हा ज्ञानेश्वरांनी उभारलेल्या ज्ञानमंदिराला आधार देण्याकरिता दिलेला खांब आहे. असे वर्णन बहिणाईने केले आहे. ही गोष्ट खरी आहे की, जरी तत्त्वज्ञानाचं अधिष्ठान ज्ञानेश्वरांनी मिळवून दिलं असलं तरी ते तत्वज्ञान सर्वजण सुलभ करण्याचं काम एकनाथांनी आपल्या विविध लेखनाव्दारे केले आहे. या अभंगात फक्त भागवताचा संदर्भ देण्यात आला आहे याचे कारण ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत यांच्यामध्ये एक नातं आहे. ज्ञानेश्वरी ही गीतेवरची टिका आहे. गीता ही श्रीकृष्णाने आपल्या एका प्रिय भक्ताला केलेला उपदेश आहे, त्याचे नाव अर्जुन. तर एकनाथी भागवत ही भागवतातील एकादश स्कंदावर केलेली टिका आहे. भागवत हा श्रीकृष्णाने आपल्या दुसऱ्या प्रिय भक्ताला केलेला उपदेश आहे, त्याचे नाव उध्दव. उपदेश तोच आहे पण फरक इतकाच की, अर्जुनाला केलेला उपदेश हे सगुण भक्तीचे प्रतीक आहे आणि उध्दवाला केलेला उपदेश हे निर्गुण भक्तीचे प्रतीक आहे. ज्ञानेश्वरीचे सुबोध विवरण करण्याच्या निमित्ताने एकनाथांनी एकादश स्कंदावर टिका लिहिली, इतका या दोन्ही ग्रंथांमध्ये बिंबप्रतिबिंब भाव आहे. एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत, चतुःश्लोकी गीता, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथांबरोबरच अभंग, पदं, आरत्या, भारुडं, गौळणी, विरहिण्या असे प्रचंड लेखण केले. जे मोठे ग्रंथ आहेत त्यांच्या ओव्यांची संख्या चाळीस हजार असून समग्र नाथ पदांची संख्या जवळपास पंच्याहत्तर हजाराच्या घरात आहे. एवढी विपुल ग्रंथसंपदा एका जन्मामध्ये निर्माण करण्याचे कर्तृत्व एकनाथांनी केले आहे.

संत एकनाथांचा जन्म पैठणला झाला मात्र नेमका कोणत्या वर्षी झाला याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. आपल्या लोकांची इतिहासाबद्दलची उदासीनता यातून दिसून येते. नाथांच्या नंतर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबद्दल तरी कुठे एकमत आहे. आपले सुदैव असे की, त्यांचा जन्म झाला याबद्दल अजूनतरी वाद नाही. नाथांचे जन्म साल शके 1450 ते 1455 दरम्यान असल्याचे सांगितले जाते. नाथांच्या घराण्यात भानुदास महाराजांची मोठी परंपरा होती. या भानुदास महाराजांनी कर्नाटकामध्ये नेलेली विठ्ठल मूर्ती आपल्या उपासनेच्या बळावर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पंढरपूरला आणून स्थापन केली. त्याअर्थाने भानुदासांचे मराठी भक्ती सांप्रदायावर मोठे उपकार आहेत. ते भानुदास महाराज संत एकनाथ महाराजांचे पंजोबा. भानुदासांचा मुलगा चक्रपाणी, त्यांचा मुलगा सूर्यनारायण. या सूर्यनारायणांचा मुलगा एकनाथ अशी ती परंपरा आहे. एकनाथांचा जन्म झाल्यानंतर काही दिवसातच त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले. त्यामुळे नाथांचे सगळे बालपण त्यांचे आजोबा चक्रपाणी यांच्या सोबत गेले. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी आजोबांना पत्ता लागू न देता देवगडाकडे कूच केली. देवगड म्हणजे देवगिरी किल्ला, आजचा दौलताबाद. त्या किल्ल्याचे किल्लेदार होते जनार्दनपंत देशपांडे. ज्यांना जनार्दनस्वामी म्हणत असत. एकनाथ या जनार्दन स्वामींच्या आश्रयाला राहिले. नाथांचे भाग्य असे की, त्यांना खुद्द जनार्दन स्वामींकडून ज्ञानेश्वरी शिकायला मिळाली. एकनाथांनी तेथे जी गुरुभक्ती आचरली त्याचे फळ आणि ज्ञानेश्वरी अभ्यासाचा प्रसाद म्हणून सहाच वर्षांनी सुलभ पर्वतावर नाथांना परमेश्वराचा सगुण साक्षात्कार घडला. त्यानंतर नाथांना काहीकाळ जनार्दन स्वामींबरोबर तीर्थयात्रा करायला मिळाली. पुढे नाथांनी एकट्याने तीर्थयात्रा पूर्ण केली व घर सोडल्यानंतर पंचवीस वर्षांनी ते पैठणला परत आले. पैठणला आल्यावर नाथांनी गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. त्यांच्या पत्नीचे नाव गिरिजाबाई. भवभूतीने ”धन्यो गृहस्थाश्रम:” असे वर्णन केलेला आदर्श, उच्चतम् संसार मराठी संतमंडळामध्ये फक्त नाथांच्या वाट्याला आला. नाथांच्या आयुष्यात संसारामध्ये मतभेदाचा प्रसंग एकदाच आला तो त्यांचा पुत्र हरीपंडिताशी. तीन वर्षांचा अपवाद वगळता नाथांचे संपूर्ण आयुष्य पैठणला गेले. या तीन वर्षांत एकनाथ महाराज काशीला होते. तेथे त्यांनी रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहिला व भागवतावरची टिका पूर्ण केली. संस्कृत भाषेचे वर्चस्व असलेल्या काशी क्षेत्रातील पंडितांनी नाथांना अतिशय विरोध केला. असाच विरोध ज्ञानेश्वरांना झाला होता, त्या घटनेचा मोठा आधार नाथांना झाला. मराठीमध्ये ग्रंथ कर्तृत्व करण्याचा आपला निर्धार नाथांनी तडीस नेला. एवढेच नव्हे तर नाथांनी “संस्कृत वाणी देवें केली, प्राकृत काय चोरापासून आली?” अशा शब्दात संस्कृत पंडितांना फटकारले.

महाराष्ट्रात भागवत तत्वज्ञानाचा प्रचार संतांनी कीर्तनभक्तीव्दारे केला हे आपण जाणतोच. या वारकरी किर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक आहेत नामदेव महाराज. नाथांनी ही किर्तन परंपरा पुढे नेली. नाथांनी लिहिलेले सर्व अभंग, गौळण्या, विरहिण्या यांना शब्द सौंदर्य तर आहेच पण त्या रचनांमध्ये अभिनयाला सुध्दा वाव आहे. त्या रचना सादर करतांना साभिनय सादर केल्या तर त्यांचा जनमानसावरील प्रभाव वाढतो हे नाथांनी स्वतःच्या किर्तनांमधून सिध्द केले. पुढचं सर्व आयुष्य नाथांनी हरिचिंतनामध्ये व्यस्त केलं. त्या आयुष्यात नाथांनी स्वतःच्या चारित्र्याचे जे गुण प्रगट केलेत त्यामुळे संत मंडळालाच नव्हे तर संपूर्ण मराठी संस्कृतीला नाथांचे नाव अभिमानाने उच्चारणे अपिरहार्य आहे. संतांनी अभंगांव्दारे ज्या गोष्टी व विचार मांडले ते आपण प्रवचन, किर्तन व विवेचनाव्दारे मांडून समाजावर आपला प्रभाव गाजवण्याचा प्रयत्न करतो. पण स्वतः ते विचार आपण अंगिकारतोच असे नाही. त्या सगळ्या गोष्टी नाथांनी केवळ कीर्तनातून सांगितल्या नाहीत, केवळ आपल्या ग्रंथात किंवा अभंगात लिहिल्या नाहीत तर नाथांनी त्या स्वतः आपल्या आचरणातून प्रगट करुन दाखवल्या. नाथांचे हे सगळ्यात मोठे कर्तृत्व आहे. माणसाच्या बोलण्याला त्याच्या स्वतःच्या आचरणाचे तारण असले पाहिजे नाहीतर ते शब्द नुसती फोलपट असतात. त्याचा प्रभाव पडत नाही. लोक फक्त ऐकतात आणि ते शब्द दुसऱ्याला उच्चारुन दाखवतात. मात्र त्या शब्दांचा कुठलाही संस्कार त्यांच्या मनावर राहात नाही. ”बरे सत्य बोला, तथा तथ्य चाला !” हे वचन आपण उपनिषदांपासून ऐकत आलो आहोत. परंतू तुमच्या माझ्या अथवा समाजाच्या जीवनामध्ये ते सत्य प्रतिष्ठित झाले आहे याचा दावा करता येत नाही. आपल्या जगण्यामध्ये सत्यवचन प्रगट व्हायला पाहिजे. असा प्रयत्न अनेकांनी केला पण संतांशिवाय ते फारसे कोणाला जमले नाही. म्हणून तुकाराम महाराजांना सांगावं लागल ‘आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया’. आम्ही वैकुंठाचे रहिवासी आहोत. ऋषींनी जे बोलून ठेवलं त्याचा तुम्हाला उपदेश करण्याकरिता आमचा जन्म नाही किंवा ते फक्त लिहून ठेवण्याकरिता आमचा जन्म नाही. तर ऋषीं जे बोलले आहेत ते स्वतःच्या आचरणातून जीवनामध्ये उतरवून दाखवण्यासाठी आमचा जन्म आहे. नाथांनी जीवनभर तेच केलं. नाथांनी मानवतावाद केवळ बोलून दाखवला नाही. श्राद्धासाठी बनवलेले जेवण पूजेसाठी निमंत्रित केलेल्या ब्राह्मणांच्या अगोदर नाथांनी ते गावकुसाबाहेरच्या हरिजनांना (त्यावेळचा शब्द आहे ‘महार’) खाऊ घातले. कारण ते भुकेले होते. गंगेच्या पाण्याची कावड घेऊन जात असताना वाळवंटात तहानेने व्याकुळ झालेले महाराचे मूल त्यांनी पहिले आणि कावडीतील गंगा त्या मुलाच्या तोंडात घातली. नाथांनी भूत दयेची, मानवतेची असंख्य कृत्ये केली.

नाथ हे शांतिब्रह्म होते. त्यांनी शांतीचा केवळ उपदेश केला नाही, साक्षात ते तसे जगले. नाथांची शांती भंग करण्यासाठी एका यवनाने केलेला प्रयोग सर्वांनाच माहिती आहे. एकवीस वेळा केलेल्या त्यांच्या गंगास्नानाची ही कथा रंगवून सांगितली जाते. त्या कथेचा शेवट असा आहे की, नाथांची शांती भंग झाली नाही पण तो यवन शरण आला. नाथांनी त्याला आपलासा केला. तुम्ही पैठणला गेलात तर तुमच्या लक्षात येईल की, तो यवन जेथे राहात होता ते त्याचे घर आता एक ‘मशीद’ आहे. तोही संत झालाय आणि नाथ षष्टीला नाथांची पालखी जेंव्हा निघते तेंव्हा आधी ती या यवनाकडे जाते मग गोदावरीवर येते.

नाथांची अजूनही अनेक अलौकिक कामे आहेत. सामान्यपणे आपल्या ती लक्षात येत नाहीत. त्यापैकी एक आहे नाथांनी ज्ञानेश्वरांची समाधी शोधून काढली, अजानवृक्षाच्या मुळ्यांनी ज्ञानदेवांच्या गळ्याला दिलेला वेढा सोडवला आणि खुद्द ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेली ‘शुध्द पाठावृत्ती ज्ञानेश्वरी’ नाथांनी पुन्हा सिध्द केली. ज्ञानेश्वरांच्या समाधी नंतर जवळपास तीनशे साडेतीनशे वर्ष त्यांनी प्रगट केलेली भावार्थ दीपिका ‘ज्ञानेश्वरी: व त्यांची ‘समाधी’ लुप्त पावली होती. प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांनीच नाथांना स्वप्नात दृष्टांत देऊन अवगत केले होते. ज्ञानेश्वरांच्या समाधीचे शोधन व ज्ञानेश्वरीची शुध्द प्रत हे नाथांचे वारकरी सांप्रदायावर, मराठी इतिहासावर आणि मराठी सारस्वतावर फार मोठे उपकार आहेत. नाथांचे अजून एक काम आपण लक्षात घेतले पाहिजे ते म्हणजे त्यांनी निर्माण केलेले लोकसाहित्य. नाथांच्या गौळणी व पदांमधून लोकभावना व्यक्त झालीच पण मुख्यत्वे भारुडांमधून लोकसंस्कृतीतल्या अनेक गोष्टींना नाथांनी चिरंजीव करुन टाकले. भारुडांमध्ये नाथांनी मानवी संस्कृतीतल्या प्रत्येक स्तरातील एक एक उपासक पकडला. पशु-पक्षांना त्यामध्ये घेतले, सामान्य माणसाच्या चालीरीती, त्यातील पात्र व लोक समूहातील खेळ त्यात घेतले. त्यावर रुपकं करुन नाथांनी भारुडं रचली. नाथांच्या सगळ्याच रचना रुपकात्मक आहेत हे त्यांचे वेगळे वैशिष्ट्य आहे. रुपके लोकांच्या तोंडामध्ये सहज खेळतात आणि त्यातील भावार्थ त्याच्या मनामध्ये पाझरत जातो. जनसामान्यांवर याचा परिणाम अधिक प्रभावीपणे होतो. नाथांची भारुडे म्हणजे एक प्रकारचे लोकनाट्य आहे.

ज्ञानदेवांनी ज्या तत्त्वज्ञानाने भागवत धर्माच्या ज्ञान मंदिराचा पाया घातला ते तत्वज्ञान नामदेवांनी किर्तनाव्दारे सर्वदूर पोहोचवले आणि ते ज्ञान सर्वसामान्य लोकांच्या कानी घातले. ते ज्ञान सर्वांच्या पचनी पाडण्याचे काम एकनाथांनी केले आणि ते ज्ञान सर्वसामान्यांच्या कंठी उतरवण्याचे काम तुकारामांनी केले. याच्या पुढे जाऊन म्हणावेसे वाटते की, ते ज्ञान लोकांच्या गळ्यातून मनात कसे उतरवायचे याची ‘किमया’ नाथांना आणि तुकोबांना साधली होती. भागवत धर्माचे हेच ज्ञान आज गावोगावी जाऊन सहजरित्या सांगणारे वारकरी आपल्याला दिसतात तो नाथांच्या व तुकारामांच्या किमयेचा ‘प्रसाद’ आहे. यातील एकनाथ महाराजांचे योगदान आपल्याला विसरता येणार नाही.

फाल्गुन वद्य षष्ठी या तिथीला एकनाथांनी समाधी घेतली. या तिथीचा मोठा इतिहास आहे आणि नाथांच्या समाधीची कथाही खूप रोमांचक आहे.. फाल्गुन वद्य षष्ठीला नाथांनी गोपाळ काल्याचे किर्तन केले आणि ते गोदावरीच्या काठी आले. पैठणला गोदावरीचे पात्र खूप मोठे आहे. प्रभूचे नाम घेत घेत एकनाथ महाराज गोदावरीच्या पात्रात शिरले. नामघोष करत नदीपात्रात ते इतके आत गेले की, त्यानंतर त्यांचा पत्ता लागला नाही. भक्तांनी अखंड गोदावरी धुंडाळली पण नाथांचा देह सापडला नाही. त्यांचे कपडे तेवढे गोदावरीत सापडले. आज पैठणला ज्या ठिकाणी एकनाथांची समाधी दाखवतात त्या समाधीखाली नाथांचा देह नाही, रक्षा नाही, अस्थी नाहीत.. आहेत फक्त कपडे ! नाथांचा असा मृत्यू हा काही योगायोग नाही. जाणीवपूर्वक त्यांनी घडवून आणलेला तो ‘योग’ आहे. नाथांचे श्रीगुरु जनार्दन स्वामी यांचा जन्म फाल्गुन वद्य षष्ठीला, स्वामींना आत्मसाक्षात्कार झाला फाल्गुन वद्य षष्ठीला, जनार्दन स्वामींनी नाथांवर अनुग्रह केला तोही फाल्गुन वद्य षष्ठीला आणि जनार्दन स्वामींनी अवतार समाप्ती केली तीही तिथी आहे फाल्गुन वद्य षष्ठी. तोच मुहूर्त एकनाथ महाराजांनी आपल्या अवतार समाप्तीसाठी निवडला हे अतिशय लक्षणीय आणि अर्थपूर्ण आहे. अपार गुरुभक्तीची व गुरुनिष्ठेची ही साक्ष आहे. आपल्या ग्रंथ संपदेतून आणि परोपकारी जगण्यातून ‘नाथ’ आजही आपल्या हृदयसिंहासनावर विराजमान आहेत.

राम कृष्ण हरी.
भवःतू सब मंगलम !

© राजेंद्र आनंदराव शेलार
[email protected]


Back to top button
Don`t copy text!