
दैनिक स्थैर्य । 18 मार्च 2025। सातारा । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत बांधणी करायची असून त्यासाठी पदाधिकारी बदल करण्यात येणार आहेत. पक्षाचे निष्ठेने, काम करतात त्यांनाच पक्षात स्थान दिले जाणार आहे. स्वार्थासाठी काम करणार्यांचा विचार केला जाणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तिकिट देतानाही तोच विचार केला जाणार असून ज्याला कोणाला कुठे जायचे त्यांनी आताच जावे. यापुढे निष्ठेने काम करणार्यांनाच राष्ट्रवादीत स्थान मिळणार असल्याचे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात झालेल्या पक्षाच्या सर्व सेलच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे व बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, प्रभाकर देशमुख, दीपक पवार, संगीता साळुंखे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीवेळी राज्यातील वातावरण बघितलं तर त्या काळात 31 जागा येतील असे वाटत होते. त्यावेळी सामान्य मतदारांनी बदल करायचा हे ठरवलं होतं. लोकांनी निवडणुका हातामध्ये घेतल्या तर नक्कीच बदल घडतो. पदाने माणूस मोठा होत नसून कार्यकर्ता प्रामाणिक असला पाहिजे. एक वेळ पद काढून घेता येते. मात्र, कार्यकर्ता पद कधीच काढून घेता येत नाही. आजच्या परिस्थितीमध्ये निवडणूक विकास कामावर लढली जात नाही. सत्ताधार्यांकडून समाजात नरेटिव्ह पसरवण्याचं काम सुरु असून जातीय तेढ निर्माण होत असतानाही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, सामान्य लोकांसाठी आंदोलने केली पाहिजेत. काँग्रेस, शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलने करताहेत. आपली लोकं आंदोलन करताना दिसत नाहीत. आंदोलन करण्यासाठी शंभर लोकांची एक टीमच तयार करण्यात यावी. आंदोलनामध्ये सक्रिय राहण्यासाठी लाडकी बहीण योजना, शाळांचा प्रश्न, बांधकाम कामगार बोगस नोंदी, महिलांची असुरक्षितता असे अनेक मुद्दे आहेत. यासाठी महिला आघाडीच्यावतीने एक टीम करावी. सरकार अनेक मुद्यांवर अपयशी असून सरकारविरोधात आवाज उठवण्यासाठी आगामी काळात रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल.
बैठकीनंतर समारोपावेळी ’जय शिवराय’ या घोषणेने कार्यालय दणाणून गेले. फोनवर हॅलो बोलण्याऐवजी ’जय शिवराय’ असे बोलण्याचे आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.