तथागत गौतम बुद्धांनी दिलेले विचारच मानव जीवन प्रकाशमय करत राहतील – उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ मे २०२२ । मुंबई । तथागत गौतम बुद्धांनी दया, क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाचा संदेश देऊन आदर्श जीवनाचा मार्ग दाखवला. गौतम बुद्धांच्या विचारातच मानवजातीचं, अखिल विश्वाचं कल्याण सामावलं आहे. बुद्धांचे विचार दु:खांचा विनाश करुन मानवी जीवन कायम प्रकाशमय करत राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तथागत गौतम बुद्धांना अभिवादन केलं असून सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त गौतम बुद्धांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री म्हणाले की, समाजातील दु:ख, अज्ञान, अन्याय, अहंकार दूर व्हावा यासाठी भगवान बुद्धांनी कार्य केलं. अखिल मानवजातीला अहिंसेचा, दयेचा, करुणेचा संदेश दिला. समाजात एकता, समता, बंधुता, विश्वशांतीचं, सलोख्याचं वातावरण निर्माण करण्याची ताकद तथागत गौतम बुद्धांच्या विचारांमध्ये आहे. भावी पिढीला जगण्यासाठी आदर्श वातावरण देण्यासाठी गौतम बुद्धांचे विचार प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरतील, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातूनच आपल्याला आव्हानांवर मात करण्याची दिशा मिळते. त्यांनी दिलेला प्रज्ञा, शील, करुणेचा संदेश आजही समर्पक आहे. त्यांचे अहिंसा, शांती, करुणा, उपेक्षितांच्या सेवेचे संस्कार समाजात शतकानुशतके रुजले आहेत. गौतम बुद्धांची व्यापक समाजहिताची शिकवण दु:खांवर मात करण्याची, संकटातून मार्ग काढण्याची ताकद सदैव देत राहील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!