शाशनाकडून प्रसारित होणाऱ्या अधिकृत बातमीवरच विश्वास ठेवावा; कोणत्याही फॉरवर्ड मेसेजवर विश्वास ठेवू नये – विशेष पोलीस महानिरीक्षक


स्थैर्य, मुंबई, दि. २९ : सध्या लॉकडाऊनच्या काळात २७ मे २०२० पासून सर्व सोशल मीडियावर एक मेसेज फिरत आहे की, “मुंबई व पुणे शहरांमध्ये कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व लॉकडाऊनच्या नियमांचे कडक शिस्तीने पालन करण्याच्या हेतूने या दोन शहरांमध्ये लष्कराला पाचारण करण्यात येणार आहे. तसेच या काळात फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने मर्यादित काळापुरती चालू राहतील”. कृपया या आशयाचा मजकूर असणाऱ्या कोणत्याही मेसजवर विश्वास ठेवू नये व हा मेसेज फॉरवर्ड देखील करू नये. त्यातील मजकूर हा खोटा असून या शहरांमध्ये लष्कराला पाचारण करण्यात येणार नाही. 

महाराष्ट्र सायबरतर्फे सर्वांना आवाहन करण्यात येते की, सर्व नागरिकांनी शासनाकडून अधिकृतपणे प्रसारित केलेल्या माहितीची नोंद घ्यावी. तसेच कोणत्याही माहितीची खातरजमा न करता व त्याची सत्यता न पडताळता मेसेज फॉरवर्ड करणे किंवा चुकीची माहिती व अफवा पसरविणे कायद्याने गुन्हा आहे.  असे खोटे मेसेज पाठविणाऱ्यांविरुद्ध पोलीस कडक कायदेशीर कारवाई करतील. अशी कृती करणे हा एक सामाजिक गुन्हा देखील आहे. अशा प्रकारचे मेसेज पाठविणाऱ्या व्यक्ती आपली समाजातील विश्वासाहर्ता गमावून बसतील व त्यांनी एखादी खरी माहिती पाठविली तरी देखील त्यांच्यावर विश्वास ठेवला जाणार नाही.

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की, विशेष करून जे व्हाट्सॲप ग्रुप्सचे ऍडमिन्स किंवा ग्रुप निर्माता आहेत त्यांनी, आपल्या ग्रुपवर अशा आशयाचे मेसेज येणार नाहीत याची काळजी घ्या.

केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागातर्फे करण्यात येत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!