स्थैर्य, दि. १८ : मध्य प्रदेशात भूमिपूत्रांनाच सरकारी नोकऱ्या दिल्या जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे. स्थानिक तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या आरक्षित ठेवल्या जातील असं त्यांनी सांगितलं आहे. करोना संकटामुळे एकीकडे अनेक मजूर, कामगारांनी स्थलांतर केलं असून रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असतानाच शिवराज सिंग चौहान यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी आपल्या या निर्णयाची माहिती दिली.
“मध्य प्रदेश सरकारने आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील तरुणांनाच सरकारी नोकरी मिळावी यासाठी आम्ही कायदेशीर पाऊलं उचलणार आहोत. राज्यातील संसाधनं फक्त मध्य प्रदेशातील मुलांनाच मिळाली पाहिजेत,” असं शिवराज सिंग यांनी म्हटलं आहे.
याआधी शिवराज सिंग यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये भूमिपूत्रांना प्राधान्य दिलं जाईल असं म्हटलं होतं. “सरकारी नोकऱ्यांमध्ये भूमिपूत्रांना प्राधान्य दिलं जाईल. देशभरात रोजगार संकट निर्माण झालं असताना आपल्या तरुणांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे,” असं शिवराज सिंग यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्याला संबोधित करताना सागंतिलं होतं. तरुणांना नोकरी देताना त्यांच्या शिक्षणाच्या आधारे दिली जाईल यासाठी योग्य व्यवस्था उभारली जाईल असंही ते म्हणाले होते.