स्थैर्य, म्हसवड दि.३ (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्यातरी शाळा, महाविद्यालये बंदच राहणार असल्याचे शासनाकडुन सांगितले जात असले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवु नये याकरीता सध्या ऑनलाईन शाळा सुरु असुन परिक्षाही ऑनलाईन सुरु आहेत,येथील क्रांतीवीर शैक्षणिक संकुलनामध्ये शिकणार्या सर्व विद्यार्थ्यांनी नुकतीच अशी ऑनलाईन परिक्षेत सहभागी होत प्रथम चाचणीची परिक्षा दिली.
सध्या कोरोनाच्या महामारी मध्ये विविध क्षेत्रांमध्ये पूर्णपणे लॉक डाउन आहे. कोरोनामुळे विविध उद्योग धंदे तसेच व्यवसाय बंद आहेत. शिक्षण क्षेत्र तर संपूर्णपणे कोलमडले आहे . अशा भयानक परिस्थितीमध्ये क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवड मधील क्रांतीवर इंग्लिश मिडियम स्कूल; क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी शाळा यामध्ये विद्यार्थी हितार्थ गेले चार महिने ऑनलाइन शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जात आहेत. विशेष म्हणजे १०० टक्के विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झालेले आहेत झूम अॅपद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांचे तास घेत असून व्हॉट्सअपद्वारे अधिक मार्गदर्शन केले जात आहे . ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून ४० टक्के अभ्यासक्रम शिकवला गेला आहे या अभ्यासक्रमांवर नुकतीच विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेण्यात आली विशेष म्हणजे चाचणी परीक्षेला विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती होती
विद्यार्थी हित लक्षात घेऊन क्रांतीवीर संकुलाने कोरोना कालावधीत केलेल्या ऑनलाइन शिक्षण प्रणालीबद्दल पालक वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. याकामी संस्थाध्यक्ष विश्वंभर बाबर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले असून संस्था सचिव व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, प्राचार्य के.के. अनुरूप संकुलातील सर्व शिक्षक यांची सक्रिय मेहनत महत्त्वपूर्ण ठरली आहे.