6, 7, 8 जुलै रोजी आयोजन, संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन
स्थैर्य, सोलापूर, दि. 2 : जिल्ह्यातील दहा औद्योगिक कंपन्यातील 1519 रिक्त पदांची भरती करण्यासाठी 6, 7 आणि 8 जुलै रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक सचिन जाधव यांनी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, लॉकडाऊनमुळे बंद झालेले उद्योग अटी व शर्तीवर सुरू झाले आहेत, अशा उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पात्रता दहावी उत्तीर्ण/अनुतीर्ण, बारावी, डिप्लोमा, पदवीधर, पदवीव्युत्तर पदवी अशी आहे.
या मेळाव्यात ट्रेनी, वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन, मिल अटेंडर, शिफ्ट असिस्टंट, कारपेंटर, ड्राफ्टसमन, सेल्स एक्झिक्युटीव्ह, सर्विस इंजिनिअर, टेली कॉलर, संगणक ऑपरेटर, विमा सल्लागार, नर्सिंग फार्मासिस्ट, ड्युटी मेडिकल ऑफिसर, सिक्युरिटी गार्ड, सुपरवायझर, स्विपर, आया या पदांची भरती होणार आहे. उमेदवारांच्या मुलाखती व्हिडीओ कॉन्फरन्स किंवा फोनद्वारे ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेनुसार https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री.जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 0217-2622113 या दूरध्वनीवर किंवा [email protected] या इमेलवर संपर्क साधावा, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.