‘एक राखी सैनिकांसाठी’ हा मुधोजी हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम : आ. दीपक चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे रक्षाबंधनाचे औचित्य साधून दि. २९ ऑगस्ट रोजी ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण उपस्थित होते. यावेळी अनेक माजी सैनिक तसेच कर्तव्यावर रुजू असलेले पण सध्या सुट्टीनिमित्त गावी आलेले सैनिक बांधव यांना विद्यालयाने पत्राद्वारे निमंत्रण देऊन रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी बोलवले होते. या कार्यक्रमास २५ आजी-माजी सैनिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली .

संपूर्ण देशाचे रक्षण हे सीमेवर लढणार्‍या सैनिकांच्या मनगटावर आधारित असते. या सैनिकांच्या देश निष्ठेमुळेच देशातील प्रत्येक नागरिक हा मुक्तपणे श्वास घेत असतो. सैनिकांच्या या देशप्रेमासाठी एक कृतज्ञतेची भावना म्हणून त्यांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यालयात बोलावून त्यांचे औक्षण करून राखी हातावर बांधणे व सीमेवरील सैनिक बांधवांना सणानिमित्त राख्या पाठवणे व त्यांच्या प्रति आदर व्यक्त करणे, हा आपल्या विद्यालयातील स्तुत्य उपक्रम ठरला आहे, असे मनोगत आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी विद्यालयातील विविध स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन आमदार दीपक चव्हाण व लष्करातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सुभेदार मेजर बांदल, शंकर बांदल, सुभेदार मेजर दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे, सुभेदार यशवंत मारुती बांदल, सर्जेराव निकम, धनाजी झणझणे, दिगंबर पवार, प्रमोद जगताप, शंकर बोबडे, तानाजी साळुंखे, पर्यवेक्षिका सौ. मनिषा बगाडे, पर्यवेक्षक गोपाळराव जाधव, ज्ञानेश्वर गायकवाड, डी. जी. पवार या प्रमुख उपस्थितांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य ज्ञानेश्वर देशमुख, माध्यमिकचे उपप्राचार्य आण्णासाहेब ननवरे व पर्यवेक्षक वसंत शिंदे यांनी गुलाबपुष्प देऊन केले.

इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींनी व विद्यार्थ्यांनी ‘एक राखी सैनिकांसाठी’ या उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यालयात राखी प्रशिक्षण कार्यशाळा हा सैनिकांचे मनोबल वाढविणारा उपक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामुळे सैनिक बांधव भारावून गेले व त्यांनी विद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच या कार्यक्रमासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच या कार्यशाळेसाठी मुधोजी हायस्कूलचे कला व सांस्कृतिक विभागाचे शिक्षक बापूराव सूर्यवंशी, चेतन बोबडे, सौ. तृप्ती शिंदे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावला.

सूत्रसंचालन संदिप पवार यांनी केले तर प्रास्ताविक सौ. तृप्ती शिंदे यांनी केले. स्वागत गीत सौ. वनिता लोणकर व इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी गायले, तर आभार अमोल सपाटे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!