स्थैर्य, सातारा, दि.०७: रानात शेळ्यांना पाला चारायला गेल्यानंतर शेतातील पाला पेटवल्याने शेजारील उकिर्ड्यांवरील चगळाला आग लागून ते पेटल्याच्या रागातून एकावर कुर्हाडीने वार केल्याची घटना गोजेगाव (ता.सातारा) येथे घडली. याप्रकरणी विजय गोरखनाथ घोरपडे (रा.गोजेगाव,ता.सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर राजेंद्र घोरपडे (रा.गोजेगाव,ता.सातारा) याच्यावर सातारा तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी विजय हे दि.4 रोजी सागर याच्या रानात शेळ्यात चारण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांनी त्या रानातील पाला पेटवून दिला होता. त्यामुळे संशयित सागर याचा शेजारीच असलेल्या उर्कींड्यावरील चगळाला लाग लागली. त्याचा राग मनात धरून सागर याने विजय यांच्याकडील शेळ्यांना पाला तोडण्यासाठी आणलेल्या कुर्हाडीने वार केले. यामध्ये विजय हे जखमी झल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व त्यानंतर विजय यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच सागर याचा मित्र महेंद्र बबन रणखांबे याने विजय यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी हवालदार सावंत पुढील तपास करत आहेत.