स्थैर्य, नागठाणे, दि. ९: ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावर बोरगाव (ता. सातारा) गावच्या हद्दीत स्वराज माझदा ट्रक टायर फुटल्याने डिव्हायडरमध्ये जाऊन पलटी झाल्याने क्लिनर जखमी झाला. सोमवारी दुपारी हा अपघात घडला. अमन तांबोळी (रा. इस्लामपूर, सांगली) असे जखमी क्लिनरचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी सांगलीहून मसाल्याची पोती भरून स्वराज माझदा ट्रक साताराकडे निघाला होता. दुपारी महामार्गावरील नागठाणे येथील उरमोडी नदीच्या पुलावरून ट्रक जात असताना त्याचा चालकाबाजूकडील पुढील टायर अचानक फुटला. त्यामुळे भरधाव वेगात असलेल्या या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने तो पूल पास करून पुढे महामार्गावरील डिव्हायडरवर जाऊन पलटी झाला.
यावेळी केबिनमधील चालक बाहेर फेकला गेला तर क्लिनर अमन तांबोळी याचा पाय पलटी झालेल्या ट्रकच्या केबिनखाली अडकला.अपघाताची माहिती बोरगाव पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनस्थळी धाव घेतली. यावेळी जनता क्रेनचे अब्दुल सुतार, सोहेल सुतार व आजीम सुतार हेही क्रेन व रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहचले. क्रेनच्या साहाय्याने केबिनखाली अडकलेल्या अमन तांबोळी यांची सुटका करून त्याना तात्काळ उपचारासाठी सातारा येथे पाठवले. यावेळी बोरगावचे सहाय्यक फौजदार देसाई, गायकवाड व हायवे हेल्पलाईनचे कर्मचारी दस्तागीर आगा व त्यांच्या कर्मचार्यांनी यावेळी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.