
दैनिक स्थैर्य । 25 मार्च 2025। सातारा । कोयना विभागातील अतिदुर्गम व चांदोली अभयारण्याच्या कोअर क्षेत्रातील कोळणे गावात अस्वलाने हल्ला करून अर्जुन मानू डांगरे यांना गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने गावकर्यांमध्ये व कोयना विभागामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या निष्क्रियतेवर नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
गेल्या काही महिन्यांत या कोयना विभागात वन्यजीव हल्ल्यांची संख्या वाढली आहे. स्थानिकांनी वेळोवेळी वन विभागाला सतर्कतेची मागणी केली होती. मात्र, कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था न करण्यात आल्यामुळे आज डांगरे यांना गंभीर हल्ला सहन करावा लागला.
गावकर्यांनी सांगितले की, डांगरे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर मदतीसाठी मोठा गोंधळ उडाला. वन विभागाच्या अधिकार्यांना माहिती दिल्यानंतरही प्रतिसाद उशिरा मिळाला. वेळेवर मदत मिळाली असती तर जखमीची परिस्थिती गंभीर झाली नसती, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे गावातील नागरिक प्रचंड घाबरले असून, आता घराबाहेर पडायलाही तयार नाहीत. आम्ही इथे सुरक्षित नाही, आमच्या लहान मुलांचे आणि वृद्धांचे काय? असा सवाल संतप्त गावकरी करत आहेत. वन विभागाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर यापुढे मोठ्या प्रमाणावर जनक्षोभउसळण्याची शक्यता आहे. सरकार आणि वनखात्याने यापुढे वन्यजीव हल्ले रोखण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत, तर स्थानिक लोकांचा वन विभागावरील विश्वास उडेल. आता तरी प्रशासन जागे होणार का, हा मोठा प्रश्न ग्रामस्थांना सतावत आहे.