दैनिक स्थैर्य । दि. १ जुलै २०२१ । माण । बोंबाळे नरवणे रस्त्यावर काळेवाडी ता. माण येथे आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण ठार तर तिघे जण जखमी झाले. प्रवीण मधुकर रणपिसे वय 26 असे मृत झालेल्या युवकाचे नांव आहे.
याबाबत पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी अनिल बापुराव रणपिसे वय 46 व प्रविण मधुकर रणपिसे वय 26 दोघेही रा. गोंदवले आज सकाळी 10 वाजता बोंबाळे, ता. खटाव येथे बुलेट मोटार सायकल (एम एच 42 टीसी 309) या गाडीवरुन निंबाळकर यांच्या घराचे बांधकामाकरिता गेले होते. बांधकामानंतर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बोंबाळे नरवणेमार्गे गोंदवलेकडे बुलेट वरुन येत होते. काळेवाडी येथे ते आले असता समोरुन चुकीच्या दिशेने येत असलेल्या मोटार सायकलची (एमएच 11 बीएस 3585) त्यांना समोरून धडक बसली. या गाडीवर गजानन शिवाजी पाटोळे व विजय शंकर पाटोळे बसले होते. दोन्ही गाड्याची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही दुचाकीवरील चौघेही जखमी झाले. आजु बाजूच्या माणसांनी अॅम्बुलन्स बोलावली व दहिवडी ग्रामिण रुग्णालयात या चौघांनाही दाखल केले. यापैकी प्रविण मधुकर रणपिसे वय 26 हे मृत झाल्याचे डाक्टरांनी सांगितले तर अनिल रणपिसे, गजानन पाटोळे, विजय पाटोळे यांना दहिवडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक फौजदार प्रकाश हंगे, संभाजी हजारे, पोलिस हवालदार बनसोडे करत आहेत.