दैनिक स्थैर्य | दि. २५ सप्टेंबर २०२३ | फलटण |
सोमंथळी (ता. फलटण, जि. सातारा) गावच्या हद्दीत बारामती ते फलटण जाणार्या रस्त्यावर काल सकाळी ८.३५ वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील एकजण ठार झाले, तर एकजण जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
या अपघाताची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सोमंथळी (ता. फलटण, जि. सातारा) गावच्या हद्दीत बारामती ते फलटण जाणार्या रस्त्यावर काल सकाळी ८.३५ वाजता होंडा शाइन मोटारसायकलवरून (क्र.युपी-८०-बीजी-९३७८) वरून सुभाष रामचंद्र देशमाने हे त्यांचा मुलगा तन्मय सुभाष देशमाने (वय १५, रा. मोरेवाडी मेडद, ता. बारामती, जि. पुणे) याच्यासोबत सासरवाडी दहिवडी येथे जाण्यासाठी घरातून निघाले होते. ते साधारणत: सोमंथळी गावच्या हद्दीत आले असता बारामती ते फलटण बाजूकडे जाणार्या रस्त्यावर वनवे केलेल्या ठिकाणी अज्ञात वाहनाने त्यांना समोरून धडक दिली.
या अपघातात सुभाष देशमाने जाग्यावरच मयत झाले असून त्यांचा मुलगा तन्मय सुभाष देशमाने हा गंभीर जखमी झाला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीक्षित करत आहेत.