स्थैर्य, मेढा, दि. ०६ : मेढ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला पाहून नागरिकांनी स्वयंस्फूतीने मेढा बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या निर्णयाला अत्यावश्यक असलेल्या भाजी विक्रेत्यांनी स्वागत करत पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे मेढा बाजारपेठेच्या बंदला आज पासून सुरुवात झाली असून शंभर टक्के बंद यशस्वी झाला आहे.
मेढा नगरीत बाहेरगावाहून येणार्यांची संख्या मोठी असल्याने मेढा नगरीत कोरोनाचे रुग्ण अत्यल्प होते. परंतु गणरायाला निरोप देताच अचानक मेढ्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढ होवू लागली. शंभरी पार करत दीड शतकाकडे वाटचाल सुरू असताना ग्रामस्थांनी दि. 5 पासून दि. 12 पर्यंत बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बाजारपेठा बंद झाल्या आहेत. पितृपंधरवडा सुरू असताना अचानक भाजी विक्रेत्यांचे व्यवसाय बंद झाल्याने बाहेरगावाहुन येणार्या नागरिकांची पंचायत झाली आहे. मेढा नगरीच्या आणि बाहेरगावच्या नागरिकांच्या हितार्थ बाजारपेठ बंद ठेवल्यामुळे गैरसोय होत असल्याने भाजी विक्रेत्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मेढा नगरी कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून पूर्णपणे प्रयत्न सुरू असून लवकरच कोरोना हद्दपार होईल, असा विश्वास जनतेतून व्यक्त केला जात आहे.