उपस्थिती शंभर टक्के, तरी काळजीसुद्धा शंभर टक्के घ्यावी – संजय भागवत, मुख्य कार्यकारी अधिकारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 22 : आजपासून नव्या नियमानुसार शासकीय कार्यालय, तसेच खासगी कार्यालयांमध्ये कंटेनमेंट झोन वगळून शंभर टक्के उपस्थिती आहे. कंटेनमेंट झोन वगळून अनेक दुकानांनाही दिवसातला ठरवून दिलेला वेळ उघडे ठेवण्याची परवानगी आहे. मात्र, याचा अर्थ संकट पूर्णपणे संपले आहे, असा नसून काळजी सुद्धा आणि खबरदारी सुद्धा 100% घ्यावयाची आहे.

जनतेच्या सोयीसाठी  शिथिलता देण्यात आली आहे. ती गरजेनुसार वापरावी. सरसकट बाहेर पडू नये. काटेकोर निर्बंध पाळावेत. जनतेच्या  अडचणी ओळखून आणि परिस्थितीचा अभ्यास करून प्रशासनाने सातारा जिल्ह्यामध्ये  शिथिलता दिली आहे. मात्र, गाफील राहू नये. विषाणूचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. पूर्वीप्रमाणेच सर्व वैयक्तिक, सामाजिक आणि कौटुंबिक नियम तंतोतंत पाळणे गरजेचे आहे. शिथिलता याचा अर्थ ; “आता धोका नाही” असा जनतेने कृपया घेऊ नये. जनतेच्या अडचणी ओळखून सामान्य लोकांच्या सोयीसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्याचा आदर ठेवून आणि स्वतःची जबाबदारी ओळखून सामाजिक अंतर पाळूनच सर्व व्यवहार करणे गरजेचे आहे.

वारंवार हात धुणे, चेहर्‍याला वारंवार स्पर्श न करणे, अत्यावश्यक गोष्टीसाठी बाहेर पडणे, मास्क वापरणे, कोणत्याही जागेत थुंकू नये अशा सर्वच गोष्टी पूर्वीप्रमाणेच पाळाव्यात. वारंवार हात धुण्याचा आणि मास्क वापरण्याचा कंटाळा करू नये. कार्यालयीन तसेच; इतर कर्मचाऱ्यांनी आणि सर्वच नागरिकांनी, घरी गेल्यावर विशेष काळजी घ्यावी आणि सर्व आवश्यक त्या गोष्टी पाळाव्यात. आपल्या आयुर्वेदिक मंत्रालयाने  सुचविलेल्या अनेक सुंदर गोष्टी आहेत:  हळद टाकून गरम पाणी  गुळण्या करणे, तसेच हळद टाकून गरम दूध पिणे, खोबरेल तेल किंवा तिळ तेल नाकात दोन थेंब सोडणे तसेच  दोन मिनिटे खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल तोंडात धरून फेकून देणे आणि गरम पाण्याच्या गुळण्या करणे, मधुमेहाचे रुग्ण वगळता इतरांनी रोज दहा ग्रॅम चवनप्राश खाणे,  आयुर्वेदिक काढा प्राशन करणे, तीस मिनिटे योगासने ध्यानधारणा, प्राणायाम करणे अशा गोष्टी आता जीवनशैलीचा भाग झाल्या पाहिजेत. गावोगावी ग्राम समिती तसेच शहरातून वेगवेगळे प्रभाग विलगीकरणसाठी कष्ट घेत आहेत. अशा विलगीकरण याला पूर्ण सहकार्य करणे गरजेचे आहे. बाहेरून आलेल्या नागरिकांवर करडी नजर ठेवावी आणि आपले कर्तव्य बजावावे. स्वच्छता सर्वप्रकारे सर्व ठिकाणी पाळणे; हा तर आपला रोजचा मूलमंत्र बनला पाहिजे. जेणेकरून संसर्ग रोखला जाईल. विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नष्ट झालेला नाही. साखळी पूर्णपणे तुटलेली नाही. त्यामुळे रोजचे जीवन जगण्यात सुसह्यता यावी, एवढाच हेतू शिथिलता देण्यामागे आहे. पूर्वीप्रमाणेच आरोग्य, पोलीस, महसूल प्रशासनाला, अंगणवाडी सेविका, आशाताई, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य केंद्रांमधील सर्व  सहकारी, पोलीस तसेच  ग्राम समिती आणि शहरातील प्रभाग समिती यांना सर्व बाबतीत सहकार्य करावे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!