स्थैर्य, फलटण : राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतमधिल यांचे प्रलंबित प्रश्न व मागण्यांकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या फलटण शाखेच्यावतीने एक दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले.
नगरपालिका व नगरपंचायतमधिल सर्व कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी, अनुकंपाधारक यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. याबाबत वेळोवेळी निवेदनेही देण्यात आली आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, प्रधान सचिव स्तरावर समक्ष बैठकाही झाल्या आहेत. परंतू शासनस्तरावर केवळ कागदी घोडे नाचविले जात असून याबाबत अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. या पुर्वीही राज्यभरात कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता तरीही शासनस्तरावर कोणतीही हालचाल दिसून आली नाही. आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून सोमवार दि. १७ अॉगस्ट रोजी फलटण नगरपरिषदेत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या फलटण शाखेच्यावतीने सफाई कर्मचार्यांच्यावतीने कामबंद आंदोलन करण्यात आले. जर आंदोलनाची दखल घेतली गेली नाही तर पाच आक्टोंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करु असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदण अस्थापना प्रमुख स्मिता त्रिबंके यांना देण्यात आले.
सदर आंदोलनात सातारा जिल्हाउपाध्यक्ष राजू मारुडा, शहर अध्यक्ष मनोज मारुडा, उपाध्यक्ष रमेश वाघेला, प्रविण डांगे, लखन डांगे, सुरज मारुडा, नितिन वाळा, सौ. राधा वाळा, सौ. शीतल वाळा, सौ. चंदा डांगे, चंदू मारुडा, रवी वाळा आदी सफाई कर्मचारी सहभागी झाले होते.