
स्थैर्य, पंढरपूर, दि.२१: आषाढी, कार्तिकीपाठोपाठ आता माघ वारीलाही पंढरपूर शहर व परिसरातील गावांमध्ये संचारबंदी लावण्यात येणार आहे. २२ व २३ फेब्रुवारीला मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असेल. मंदिरातील सर्व नित्योपचार, प्रथेनुसार धार्मिक कार्यक्रम होतील. एसटी वाहतूक नियंत्रित स्वरूपात सुरू राहील. पंढरीतील मठांची नियमित तपासणी होणार असून मुक्कामाची सोय नसेल, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत.
येत्या मंगळवारी (दि.२३) माघवारी आहे. प्रामुख्याने सोलापूर शहर व परिसरातील अनेक छोट्या-मोठ्या दिंड्या या वारी सोहळ्यात दरवर्षी सहभागी होतात. पण, यंदा कोरोनाचे सावट असल्याने दिंड्यांना पंढरपूर शहरामध्ये प्रवेश नाही. दरवर्षी माघवारीला राज्यभरातून २५० हून अधिक दिंड्यांसह, तीन ते चार लाख वारकरी पंढरीत दाखल होतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी दिंड्यांना पंढरपूरमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
मठांची नियमित तपासणी
पंढरपूर शहरातील मठ, स्थानिकांनी भाविकांना राहण्यासाठी खोल्यांची सोय करण्यास बंदी असेल. शहरामध्ये सुमारे १२०० मठ आहेत. यात्रेपूर्वी काही दिवस या मठांची तपासणी होणार असून संबंधितांना नोटीस देण्यात येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
वारसकर महाराज दिंडीची अभंगसेवा, चक्रीभजन
माघ दशमी (दि.२२) रोजी वासकर महाराज यांच्या दिंडीतील वारकरी, मानकऱ्यांसह फक्त सहा जणांना प्रवेश देण्यात येईल. सभा मंडपात आरती, अभंग सेवा करतील. शारीरिक अंतर, मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. माघ शुद्ध त्रयोदशी (दि.२५) औसेकर महाराज यांच्यासह १२ मानकऱ्यांच्या उपस्थितीत सभा मंडपात योग्य अंतरावर चक्री भजन करण्यास परवानगी असेल. तसेच, पुंडलिक राया उत्सव काला निमित्ताने (दि.२५) मानकरी, वारकऱ्यांच्यासह २६ जणांना दहा ते १२ वाजेपर्यंत काल्यास परवानगी असेल.
पूजाविधी, नैवेद्यासाठी मर्यादित प्रवेश
माघ वारी निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा, नैवेद्यासाठी मंदिर समितीचे एक सदस्य पत्नीसह पाच जणांच्या उपस्थितीत महापूजा होईल. त्या कालावधीत संबंधितांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. पूजेच्या वेळेत पौरोहित्य करणारे मंदिर समितीचे कर्मचारी, समिती व सल्लागार परिषदेचे सदस्य, अधिकारी उपस्थित राहतील.
पंढरपूर, परिसरात २४ तासांसाठी संचारबंदी
माघ वारीच्या निमित्ताने शहर व परिसरात तीन त चार लाख भाविक दाखल होऊ शकतात. शहरामध्ये गर्दी होऊ नये यासाठी २२ फेब्रुवारीला रात्री १२ वाजल्यापासून २३ फेब्रुवारीला मध्यरात्री १२ वाजेपर्यंत (२४ तासांसाठी) पंढरपूरसह परिसरातील भाटुंबरे, चिंचोळी, भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव-शिरढो, कौठाळी गावांमध्ये संपूर्ण संचारबंदी असेल.