दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२२ । फलटण । संवेदना मनाला जावून भिडून तोंडातून आपोआप शब्द बाहेर पडतात तेव्हा काव्य निर्माण होते. हे काव्य मनाला आनंद देणारे असेल तर ते अधिक भावते. त्यासाठी मनावर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. मनावर संस्कार म्हणजे अध्यात्म असे संतांनी सांगितले आहे. आपली वैचारिक उंची किती आहे त्यावर आपले यश अवलंबून आहे. स्वत: साठी काम करत समाजासाठी काम केले तर आपण यशस्वी जिवन जगतो व त्याचा आनंद मिळतो असे विचार श्री सेवागिरी महाराज मंदिर पुसेगाव येथे माजी प्राचार्य मधुकर कोथमिरे लिखित मधुकर काव्यसंग्रह प्रकाशन प्रसंगी प्रमुख वक्ते माजी प्राचार्य रविंद्र येवले यांनी मांडले.
यावेळी व्यासपीठावर डॉ. सुहास फडतरे, शामपुरी महाराज, सुभाष महाराज, शिवानंद भारती महाराज, साहित्यिक ताराचंद्र आवळे, प्रकाशक बकूल पराडकर उपस्थित होते.
यावेळी साहित्यिक ताराचंद्र आवळे म्हणाले की, मधुकर हा काव्यसंग्रह मानवी जीवनाला दिशादर्शक असून जिवन जगताना त्यातील एक एक मुल्य सकारात्मक विचाराने प्रेरित करेल व निराशेच्या गर्तेतून बाहेर काढेल. आध्यात्म व चिंतनशील विचार याचा परिपूर्ण आविष्कार म्हणजे मधुकर काव्यसंग्रह होय, साहित्य विश्वात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण वाचकांना ऊर्जा देणारा ठरेल.
यावेळी शिवानंद भारती महाराज, डॉ सुहास फडतरे महाराज, सुभाष महाराज,बकूल पराडकर यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त करून अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी प्राचार्य मधुकर कोथमिरे यांनी करून सर्वांचे स्वागत केले. आभार सुरेश सूळ महाराज यांनी मानले. मान्यवरांच्या हस्ते मधुकर काव्यसंग्रहाचे प्रकाशन केले. यावेळी संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ दीपक कदम, प्राचार्य जे. के. मुळे, प्राचार्य तानाजी जाधव, धनंजय बापू, रामभाऊ जाधव, एम. आर. जाधव,साहित्यप्रेमी, ग्रामस्थ व तरुण वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ श्रेया कोथमिरे व राहुल कोथमिरे यांनी विशेष परिश्रम घेतले.