दैनिक स्थैर्य । दि. १७ जून २०२२ । नागठाणे । घरगुती वाद मिटविल्याचा राग मनात धरून एकास लाकडी दांडक्याने मारहाण केल्याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रफुल्ल विनोद बल्लाळ रा.निनाम ता.सातारा असे गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव असून तानाजी जिजाबा जाधव वय :- ४० वर्ष रा.निनाम ता.सातारा असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तानाजी जाधव हे दि. १५ जून रोजी निनाम गावातील मळवी नावाचे शिवारात उसाचे रानातील गवत काढण्यासाठी दोन मित्रांना बरोबर घेऊन गेले असता दुपारी जेवण करण्यासाठी घरी आले होते. त्या दरम्यान परत शेतामध्ये जाण्यास निघाले असता प्रफुल्ल बल्लाळ आणि त्याचे चुलते चंद्रकांत बल्लाळ यांच्यामध्ये घरगुती कारणावरून वाद चालू असल्याचे दिसले असता त्यावेळी सदर वादामध्ये मध्यस्थी करून वाद मिटवला. त्यानंतर चुलते पुतणे दोघे जण घरी गेले. सायंकाळी शिवारातील काम करून घरी येत असताना गावातील रस्त्यावर थांबले असता प्रफुल्ल बल्लाळ याने काल दुपारी मिटविलेल्या वादाचा राग मनात धरून डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाल्यामुळे नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर परत आल्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अधिक तपास चालू आहे.