दैनिक स्थैर्य । दि. १० जानेवारी २०२३ । माण । माण तालुक्यातील बंधार्यावरील लोखंडी प्लेटा चोरणाच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. विशेष म्हणजे मोक्काच्या गुन्ह्यातून सुटलेल्या आरोपीचा या चोरीत सहभाग आहे. त्यांच्याकडून पीकअप वाहन व प्लेटा असा 9 लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
अक्षय पोपट धस (वय २६, रा. क्षेत्रमाहुली ता. जि. सातारा) व नितीन उर्फ आप्पा अशोक साळुंखे (वय ३३, रा. भादे, ता. खंडाळा जि. सातारा) अशी आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, अरूण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांच्या अधिपत्याखाली एक तपास पथक तयार करून त्यांना चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशीत केले होते. दि. ७ रोजी देवकर यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, काही इसम कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्यावरील बंधार्यालगत काढून ठेवलेल्या चोरीच्या लोखंडी प्लेटा पैकी काही प्लेटा पिकअप (क्रमांक एमएच ११ डीडी ११८७) यातून विक्री करण्याकरिता बॉम्बे रेस्टारंट चौक सातारा जवळ थांबला आहे. त्यानुसार सदर ठिकाणी जावून त्या इसमास ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना तासगांवकर व तपास पथकास दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांनी तपास पथकासह जावून प्राप्त झालेल्या माहितीच्या ठिकाणी वर नमुद आरोपीचा शोध घेत असताना ते सापडले. माहितीतील इसम महिंद्रा पिकअप (क्र. एमएच ११ डीडी ११८७) मधून बॉम्बे रेस्टॉरंट चौक साताराकडे येत असताना दिसून आले. त्यामुळे पथकातील अंमलदार यांनी त्यास गाडी थांबविण्याचा इशारा केला असता त्याने गाडी भरधाव वेगात घेतली.
त्यास पथकाने पाठलाग करून थांबविले असता त्यातील एकजण पळून गेला. महिंद्रा पिकअपच्या चालकास ताब्यात घेवून त्यांच्याकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांने दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जाधववस्ती शेजारील माणगंगा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्यावरील बंधार्यालगत काढून ठेवलेल्या लोखंडी बर्गे (प्लेटा) पैकी काही प्लेटा चोरी केली असल्याबाबतची कबुली दिलेली असून त्याच्याकडून एकुण 9 लाख ३० हजार रूपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. मिळून आलेला व पळून गेलेला संशयित इसम हे महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९ (मोक्का) मधून नुकतेच जामीनावर सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा नव्याने चोरीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेले आहे.
या कारवाईत अधिकार्यांसह पोलीस अंमलदार उत्तम दबडे, तानाजी माने, अजित कर्णे, अमोल माने, मुनीर मुल्ला, शिवाजी भिसे, प्रवीण कांबळे, स्वप्नील दौंड तसेच दीपाली यादव यांनी सहभाग घेतला.