स्थैर्य, सातारा, दि. 6 : जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून दि. 30 जून रोजी सातारा शहरातून विविध इसमांना तडीपार केले होते. तरीही शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकजण तडीपार आदेशाचा भंग करत मोकाट फिरताना आढळून आल्याने त्याला शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केले असून, यामध्ये अनिल सुरेश धांडे (रा. मोळाचा ओढा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. 4 जून रोजी शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत राहणारा तडीपार इसम हा मोळाचा ओढा परिसरात फिरत आहे, अशी माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत बातमी मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफला त्या इसमाचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करून त्या तडीपार इसमाचा शोध घेत असताना सायंकाळी 6.35च्या सुमारास आझादनगरमधील आझाद बेकरीच्या समोर तोंड बांधून एक संशयित इसम फिरत असताना दिसून आला. त्याचा गुन्हे प्रकटीकरण शाखेस संशय आल्याने त्याच्याजवळ जात असताना तो इसम पळून जाऊ लागला. म्हणून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचार्यांनी त्याचा पाठलाग करून शिताफिने पकडले. त्याची माहिती घेतली असता तो सातारा जिल्ह्यातून तडीपार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यास तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
ही कारवाई सपोनि विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप शितोळे, पोलीस नाईक लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्नील कुंभार पो. कॉ. ओंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते यांनी केली.