सोन्याच्या दुकानातून हातचलाखीने दीड लाखाचे गंठण लंपास


स्थैर्य, फलटण दि.26 : फलटण शहरातील पृथ्वी चौक परिसरातील शांतीकाका सराफ या सोने विक्रीच्या दुकानातून अज्ञातांनी दीड लाखाचे गंठण लंपास केल्याची घटना गुरुवार दिनांक 24 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, दि.24 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पृथ्वी चौक, फलटण येथील शांतीकाका सराफ दुकानात एक अनोळखी महिला (वय अंदाजे 30) व एक अनोळखी पुरुष (वय अंदाजे 35) हे दोघे सोन्याचे गंठण खरेदी करण्याच्या बहाण्याने आले होते. त्यांनी गंठण बघत असताना 1 लाख 50 हजार किंमतीचे 31 ग्रॅम 710 मिली वजनाचे पूर्ण सोन्याची पट्टी असलेले सोन्याचे गंठण दुकानदाराची नजर चुकवून हातचलाखीने लंपास केले. याबाबतची फिर्याद नितीन शांतीलाल गांधी यांनी दिली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विरकर हे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!