
दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२२ । फलटण । नभ नाभाचेनि सळें । क्षोभु वाहिजे कालिंदी जळें ।। सासिन्नले जगाचे डोळे । ते रुप पहावया ।।
श्री. ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तिरसाला व प्रतिभेला बहर आला आणि त्यांच्या मुखातून शब्द उमटले.. ‘त्याच्या अनन्य रुपाचे सान्निध्य लाभले म्हणून एका आकाशाला दुसऱ्या आकाशाचा हेवा वाटत होता, ज्याच्या स्पर्शासाठी यमुनेचे पाणी उचंबळून येत होते, ज्याने सर्व जगाची दृष्टी आपल्याकडे खेचून घेतली होती आणि मनाची गती कुंठित केली होती तो सावळा वनमाळी साक्षात भगवंत आमच्यासाठी कमरेवर हात ठेऊन भीमा नदीच्या तीरावर उभा आहे. त्याची ती समचरण मूर्ती सर्वांना प्रेमाचा, ममत्वाचा, समतेचा बोध देत आहे. ती मूर्ती साक्षात आमच्या हृदयातलीच आहे, पण बाहेरचे सोंग घेऊन सगुण रुपात भक्तांचे लाड पुरवण्यासाठी विटेवर उभी आहे.’
अंतरंगातील विचक्षण तळमळीने भाव-विभोर होऊन श्री. विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेला वैष्णवांचा मेळा आज पंढरपुरात पोहोचला. चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यांची दाटी झाली आहे. चारी दिशांनी दिंड्या पताकांचे भार दाटले आहेत. अवघी पंढरपूर नगरी श्री. विठ्ठलाच्या आणि संतांच्या जयघोषाने दुमदुमली आहे. अवघे गर्जे पंढरपूर । चालला नामाचा गजर ।। याची अनुभूती पंढरपूर निवासी व आसमंतातील सुरवरही घेत आहेत. देव आणि भक्त यांच्या भेटीचा अनुपम्य सोहळा पाहण्यासाठी आज चंद्रभागेच्या पाण्याला उधाण आले आहे. एवढेच नव्हे; स्वतः तो विठू दोन्ही हात उभारुन भक्तांना पालवीत आनंदाने नाचत आहे.
आणीक या मना नावडे सोहळा । करितें टकळा माहेरीचा ।। बहू कामें केलें बहू कासावीस । बहू झाले दिस भेटी नाहीं ।।
आपले माहेर असलेल्या पंढरीला जाण्याची वारकऱ्यांच्या हृदयाला लागलेली अती हुरहूर व्यक्त करताना स्वतः तुकाराम महाराज कासावीस होतात. एवढे काय विशेषत्व आहे या पंढरीच्या विठ्ठलाचे? ज्याने सगळ्या जगाला मोहित केलें आहे! भागवत धर्म विचारांच्या अधीन असलेल्या महाराष्ट्रातील ‘वारकरी’ सांप्रदायाने श्री. विठ्ठलाला आपले आराध्य दैवत मानले आहे. वारकरी सांप्रदाय आणि श्री. विठ्ठल ही एक विचारधारा आहे. भक्ती करुन कैवल्य प्राप्तीचा अधिकार नसलेल्या सर्वांना वारकरी भक्ती सांप्रदायाने तो अधिकार बहाल केला आणि ज्ञानाची, मोक्षाची व्दारे त्यांच्यासाठी खुली केली. “नटखट यावे शुध्द होऊनि जावे । दवंडी पिटे भावे चोखा मेळा ।।” कोणीही या, क्षुद्रातिक्षुद्र, स्त्री-पुरुष एवढेच नव्हे तर तामसी खळांनोही या आणि पवित्र होऊन जा. एवढा सामर्थ्यशील आमचा पंढरीश परमात्मा आहे. अशी ग्वाही यातिहीन असलेल्या संत चोखा मेळा यांनी दिली. भारतीय धर्म परंपरेतील अत्यंत क्रांतिकारक असा हा विचार आहे. व्यावहारिक कर्तव्यनिष्ठेला व समाजिक नितीमत्तेला पोषक अशी कर्मे करावीत; असे सांगून वारकरी संप्रदायाने प्रपंच व परमार्थ यात समन्वय साधला आहे. नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, चोखामेळा, गोरा कुंभार, सावता माळी, नरहरी सोनार, सखुबाई, जनाबाई आदी सर्व वारकरी संत गृहस्थाश्रमी व कुटुंबवत्सल होते. आपापले व्यवसाय निर्वेधपणे करुन व सहजपणे एकमेकांत मिसळून वैष्णवांच्या सामूहिक भक्तीचा आदर्श त्यांनी निर्माण केला. सर्वसामांन्यांच्या मनात भरलेला न्यूनगंड नाहीसा करुन त्यांच्या जीवनात कार्य प्रवर्तक निष्ठा उत्पन्न केली. त्यांच्या नीरस अशा जीवनात अध्यात्मज्ञानाची जोड मिळवून दिली. त्यामुळे आपल्यातील सुप्त शक्तींची व भावनांची जाणीव त्यांना झाली. वारकरी पंथाने ज्ञानाचे, विद्वत्तेचे अवडंबर माजवले नाही. निस्सीम भक्ती हाच या संप्रदायाचा आधार आहे. अंधभक्तीला आणि अंधश्रद्धेला त्यांनी थारा दिला नाही. किर्तन, अभंग, गौळणी, ओव्या, भारुडे इत्यादी सुलभ साधनांनी त्यांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहचविले. आत्मशुद्धी व सदाचार यावर वारकरी पंथाने भर दिला. निष्ठा, त्याग, धैर्य, सहिष्णूता, उदारता, मानवता, समता आणि विवेकबुध्दी या गोष्टींनी वारकरी सांप्रदायाने लोकांची मने जिकून घेतली. ज्या श्री. विठ्ठलाने आपल्या कर्तुमअकर्तुम शक्तीने हे दिव्य ज्ञान सर्व भक्तांसाठी उधळले आहे त्या विठ्ठलाच्या भेटीची, दर्शनाची अनामिक ओढ या वारकऱ्यांच्या मनाला लागलेली असते. वर्षभर प्रपंचातील कामधंदा पुष्कळ केला. भजन कीर्तनातून त्याला आळवण्याचा पुष्कळ प्रयत्न झाला पण त्याच्या भेटीसाठी आमचा जीव कासावीस झाला आहे. किर्तन भक्तीचा नवोन्मेष निर्माण करणाऱ्या वारकऱ्यांचे आराध्य असलेल्या श्री. विठ्ठलाची आषाढ शुध्द एकादशीला वार्षिक यात्रा आहे. विठ्ठल भेटीची आणि संत समागमाची लयलूट करण्यासाठी वैष्णवांचा मेळा आज दशमीला पंढरपुरात पोहोचला आहे.
भीमा तीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर हो । तेथील मोकाशी चारभुजा त्यासी, बाईल सोळा हजार हो ।। पंढरपूरचा क्षेत्र महिमा सांगताना संत म्हणतात की, परमेश्वराने स्वतःच भीमा नदीच्या काठावर हे नगर वसवले आहे. तेथे अधिष्ठित असलेला पंढरीश परमात्मा हा त्याच्याच्या कृष्णावताराचे उत्तर कालीन लावण्य सुंदर रुप आहे. पांडुरंगाचे जे ध्यान विटेवर उभे आहे ते अती सुंदर असून त्याने कमरेला सुवर्णं पितांबर धारण केला आहे. गळ्यात तुळशीचा हार आणि कंठात कौस्तुभ मनी मंडित असलेला हा विठ्ठल सर्व सुखांचें आगर आहे. त्याचे सुशोभित मुख मी अत्यंत आवडीने पाहीन. जणू हा राजस सुकुमार मदनाचा पुतळाच आहे. त्याच्या तेजाने सूर्य-चंद्रांच्या प्रभा लोपून गेल्या आहेत. मस्तकावर मुकुट आणि कानांत कुंडले असलेले याचे श्रीमुख अत्यंत शोभून दिसत आहे. अशा विश्व नियंत्याला आम्ही काय देणार? पण ‘देवं भावाचा भुकेला’ अशी त्याची वंदता आमच्या कानी आहे. शुध्द भावनेने आम्ही तुझी कीर्ती गात आहोत. आमची ही भोळी भक्ती तू रुजू करुन घे.
आपल्या भक्तांच्या भेटीसाठी आतुर झालेल्या पांडुरंगाला भोवळ आली. देवाची ही भावविवश मनोवस्था पाहून रुक्मिणी आईसाहेबांना हसू आवरले नाही. भगवंताला हळूच हलवून रुक्मिणी म्हणते..
“उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरूडापारी दाटला । वाळवंटापासूनि महाद्वारा पर्यत, सुरवरांची मांदी उभे जोडोनि हात ।।” 🙏🙏
राम कृष्ण हरी.
भवःतू सब मंगलम !
© राजेंद्र आनंदराव शेलार
[email protected]