दैनिक स्थैर्य । दि. २२ जून २०२२ । सातारा । नजरेसमोरुन पट उलगडत होता. आठवणींच्या स्मृतीपटलावर साचलेल्या घटनांचा आणि भावभिवर करणाऱ्या गोष्टींचा; ज्या कधी माझ्या आयुष्यात घडलेल्या तर कधी पूर्व सुरींनी अनुभवलेल्या. त्या आज माझ्या नजरेसमोर उभ्या आहेत कारण मला लिहिण्याचा मोह झाला आहे. ‘वारी’ च्या वाटेवर पुढे वीस पंचवीस दिवस हा अल्पसा प्रयत्न करणार आहे.
लाखो वारकऱ्यांची मांदियाळी सोबत घेऊन संतांची पावले पंढरीच्या दिशेने निघाली आहेत. मीही असेन शरीराने कधी त्यांच्या सोबत तर कधी मनाने चालत असेन वारीच्या वाटेवर. पुढचे वीस पंचवीस दिवस भारावलेले असू आपण सर्वचजण ईश्वर भक्तीच्या गजराने. कानात गुंजत असतील टाळ – मृदंगाचे स्वर आणि अभंगांच्या मधुर शब्दांचे बोल. या प्रवासाची सुरुवात झाली तीच मुळी जन्मापासून. घरातले आणि गावातले वातावरण वारकरी संप्रदायाचे. ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव, एकनाथ, जनाबाई, सखुबाई, सावता, गोरा, चोखा आणि मुक्ता ही नावं कधी परकी वाटली नाहीत. किंबहुना हेच आमचे पूर्वज होते ज्यांनी अज्ञानाच्या अंधार कोठडीतून हाताला धरुन उजेडात आणले. माझ्या खापर पंज्याचे नाव नाही सांगता येणार पण ठरवून विसरायचे म्हटले तरी नाव नाही विसरणार दामाजीचे. तो संस्कार मनावर बिंबवला माझ्या पूर्वसुरींनी. कारण त्या पूर्वजांनी भोगला होता अन्याय, अत्याचार चार हजार वर्षांचा. अपमान, अवहेलनेच्या मुळावर घाव घालून त्यांना दाखवली होती एक वाट ईश्वर भेटीची आणि दुसरी ज्ञानाच्या प्रकाशात भौतिक प्रगतीची. रुढी, परंपरा आणि अंधश्रध्येत बुडालेल्या माझ्या पूर्वजांच्या दुबळ्या मनाला आत्मविश्वासाचे नवे पंख लाऊन विश्वाच्या गाभाऱ्यात विहार करण्याची शक्ती दिली होती त्या संत मांदियाळीने. म्हणूनच गेली अखंड सातशे वर्षे पावले चालत आहेत त्या वाटेवर; ज्या वाटेवर दर्शन घडेल विश्वात्मक विधात्याचे, जो विराजमान आहे प्रत्येकाच्या हृदयात.
एक पाऊल देहाचे, दुसरे मनाचे, तिसरे बुद्धीचे.. पुढचे पाऊल प्रतिभेचे मग आपोआप पावले पडत गेली अहंकाराची, मी पणाची आणि शेवटी माणुसकीची. या पावलांनी एवढा प्रवास केला, की त्यात सारा दुराग्रह ओलांडून झाला. शेवटी माणूस नावाचा एकच सवंगडी सोबत राहिला. तोच ईश्वर, तोच परमेश्वर, तोच विश्व नियंता. एवढ्या लांबवर आणि एवढ्या काळानंतरही ही पावले साथ देताहेत. अगदी तशीच, जशी सातशे वर्षांपूर्वी देत होती. पण आता त्यांचा संबंध फक्त देहाशी आहे.! मन तसेच आहे का? बुध्दी तशीच आहे का? प्रतिभा आणि माणूसपण तसेच टिकले आहे का? मनात अनेक प्रश्न आहेत. माझ्यापुरतं मी सांगेन, मी तसाच आहे; ताजा अन टवटवीत. अगदी पाचव्या वर्षी होतो तसाच. ज्यावेळी कानांवर पडलेल्या अभंगांचा अर्थ पहिल्यांदा समजला होता. या काळात वैचारिक दारिद्रय सोसले अन वैभवही अनुभवले.. कधी जीवनात चढउतार आले तर कधी दुःखाची किनार अधिक वरचढ झाली.. आणखी एक, कुणाच्या वाट्याला येणार नाही असे प्रेम अनुभवले आणि तरीही प्रेमाचा भुकेला राहिलो.
भोवतालचे जग मात्र पूर्ण बदलून गेले आहे. सोईचा अर्थ आता सोईनुसार अंगवळणी पडू लागला आहे. कोठे जन्मलो अन कोठे पोहोचलो, वाटेत काय अनुभवले याचा सोईस्कर विसर पडला आहे. कदाचित दोष त्यांचा नाही. त्यांना ठाऊकच नाही त्यांच्या पूर्वजांचा प्रवास. असे असले तरी मनात आशा आहे आणि भविष्य उज्वल दिसत आहे. कारण या समाजाने अजून वाट सोडलेली नाही. आजही लाखोंच्या संख्येने त्या मार्गाने प्रवास करण्याची अभिलाषा त्यांच्या मनात आहे. संतांचे बोट सुटलेले नाही आणि सुटणारही नाही असे विश्वासदर्शक चित्र आहे. मनामध्ये इच्छा आहे, हातांमध्ये टाळ आणि गळ्यामध्ये मृदंग आहे, मुखी नाम आहे आणि अभंगवचने सतत कानावर पडत आहेत. कदाचित संभ्रांत झालेल्या समाज मनाला आज त्या अभंगाचा अर्थ लागत नसेल. पण एक दिवस नक्की येईल जेंव्हा पुन्हा विचारांची बांधिलकी मानून त्यांचा प्रवास सुरु होईल. अन मग जराही न अडखळता तो पुढे अविरतपणे चालू राहील.
पंढरपूरची ‘वारी’ ही भक्तीची साधना आहे. पण येथे केवळ भक्ती नाही. ही आहे मानवतेची अखंड वाहणारी सरिता आणि येथे आहे ज्ञानाचा सागर. हा ज्ञानसागर विवेकावर अधिष्ठित आहे. वारकरी संप्रदायाच्या या डोळस भक्तीला सात्त्विकतेचा साज आहे.
अमोलिक रत्न जोडले रे तुज | कां रे ब्रह्म – बीज नोळखसी || न बुडे न कळे न भिए चोरा | ते वस्तु चतुरा सेविजेसु || ज्ञानदेवो म्हणे अविनाश जोडले | आणूनि ठेविले गुरु मुखीं ||
ज्ञानदेव म्हणतात, ते आत्म-ज्ञान माझ्या कायमचे हातात आले आहे. आणि गुरु मुखाने लाभलेल्या शब्दात मी ते साठवून ठेवले आहे. श्री. संतांचा हा अविचल भाव पुढील वीस दिवस आपण आपल्या अंतर्मनात रुजवण्याचा प्रयत्न करुया.. आरंभ पर्वाचे हे दोन शब्द श्रीगुरुंच्या चरणी अर्पण.
|| भवःतू सब मंगलम | राम कृष्ण हरी ||
© राजेंद्र आनंदराव शेलार
[email protected]