दैनिक स्थैर्य । दि. ०१ जुलै २०२२ । फलटण । ईश्वराच्या रुपाविषयी साधकांच्या मनाला विलक्षण ओढ असते. परमेश्वराचे रुप डोळ्यांनी पाहावे आणि ते अंतःकरणात साठवून ठेवावे ही भक्तांची लालसा कधी लपून राहिलेली नाही. ईश्वराच्या अस्तित्वाची ओळख करुन देताना ‘विश्वाच्या कणाकणात तो सामावला आहे, तो अणुरेणू पेक्षाही सूक्ष्म आणि ब्रह्मांड व्यापून उरेल इतका विशाल आहे’ असे त्याचे वर्णन केले जाते. हा विचार करता ईश्वर नेमका कसा असेल याचे कुतूहल सर्वांनाच आहे. खरंतर ईश्वर हे अनाकलनीय कोडे आहे. या विश्वाचा सगळा व्यवहार त्याच्याच सत्तेने चालतो आणि नीती-अनीतीचा खेळही त्याच्याच मर्जीवर अवलंबून आहे. असा हा ईश्वर ज्याला जसा भावला तसा त्याने मनात साठवला व त्याची साकार स्वरुप मूर्ती स्थापून उपासना सुरु केली. “ईश्वर एकच आहे, पण उपासक त्याची बहुविध उपासना करतात” असे श्रुती सांगते. उपासकाच्या भक्तिभावामुळे त्यांची उपासना योग्यही असेल पण तीच गोष्ट अज्ञानी जनतेच्या भ्रमाला कारणीभूत झाली आहे. ईश्वर शोधात सैरभैर होऊन ही जनता सर्वत्र हिंडू लागली आहे.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.. ईश्वर अव्यक्त आहे. त्याला रुप नाही, गंध नाही, आकारही नाही. तेथे चित्रकलेचा प्रवेश कसा होऊ शकेल ? पण काल्पनिक संकेत रचून चित्रकार आपापल्या हौसेप्रमाणे त्याची प्रतिमा बनवतात. आणि भक्तजन तसल्या मूर्तीमध्ये सर्वव्यापक, निर्लिप्त परमेश्वराचे रुप न्याहळु लागतात. जे ध्यानयोगी आहेत ते ज्योतिर्मय ओंकार स्वरुपात ईश्वराची उपासना करतात. हे ध्यानयोगी सांगतात की ईश्वराला विश्वरचनेचा छंद लागला. त्या छंदातून ॐ हा नाद निघाला. तोच पुढे तीन कलांनी चिरला जाऊन त्यातून तीन देव आणि तीन जगे निर्माण झाली. ही सगळी उत्पत्ती गृहीत धरली तरी ती ईश्वर स्वरुपाच्या अगदीच अलीकडची आहे. जो स्वयं तृप्त, नित्य परिपूर्ण, आनंद स्वरुप आहे त्याला कसला छंद आणि कुठला नाद ?
जे धर्म परायण लोक आहेत ते ईश्वराची अवतार रुपात उपासना करतात. धर्म परायण असे मानतात की, ईश्वर वेळोवेळी अवतार घेतो. त्याच्या त्या त्या अवतारातील रुपाची हे भक्त पूजा करतात. ज्ञानेश्वर महाराज ईश्वराच्या याही विविध रुपांना नाकारतात.. ईश्वर समष्टी स्वरुप आहे. प्रत्येकाच्या हृदयात त्याचे अस्तित्व आहे. त्याला आदी ना अंत; ना जन्म ना मृत्यू ; तो केवळ निर्विकार आहे! अवतारी शक्तींकडून ईश्वरी कार्य घडत असते ही गोष्ट खरी, पण ते मायेचे लाघव आहे. माया ही ईश्वराची एक सामान्य दशा आहे. या मायेलाच हे भक्त ईश्वर समजून तिची उपासना करतात. ठिकठिकाणी दिसणारी देवाची विविध अवतारी रुपे म्हणजे ईश्वर नव्हे. तो भक्तांच्या बुध्दिचा भ्रम आहे.
ज्ञानेश्वर शेवटी म्हणतात.. तो ईश्वर तर अंतर – बाह्य भरुन राहिला आहे. इंद्रियांव्दारे त्याची उपासना खुशाल केली जावो, पण इंद्रियांना त्याचे दर्शन मात्र होणार नाही. तो क्षेत्रक्षेत्राहून वेगळा, क्षराक्षरातीत असून असा पुरुषोत्तम सर्वांच्या हृदयात विराजमान आहे. तेथेच त्याचे दर्शन घ्यायला पाहिजे.
अशावेळी आपल्या मनात प्रश्न येऊ शकतो की, ईश्वराचे सगुण रुप नाही तर वारकरी भक्त, जो सगुण रुपात आहे त्या पंढपूरच्या पांडुरंगाची उपासना कशी करतात? ज्ञानेश्वर महाराज या शंकेचे निरसन करताना सांगतात.. वारकरी भक्त ज्या श्री. विठ्ठलाची सगुण रुपात भक्ती करतात ते निर्गुण निराकार ‘अ-रुप’ आहे. कटेवर हात आणि मुखकमलावर तेज पुंजाळले आहे. त्याची कांती दिव्य असून अगणित लावण्याने प्रभा उजळून निघाली आहे. स-रुप असूनही कोणत्याही रुपाशी त्याचे साम्य नाही. हे सगुण रुप निर्गुण समजायला कठीण वाटते पण ते तितके कठीण नाही. कारण ते उघडच निर्गुण आहे. सगुणाचे पांघरुण घेतलेले, नाना नाटकें रचणारे हे रुप आहे. या रुपाचा कोणताही मानवी अवतार नाही, ते तर भक्तांकारने विटेवर स्थित आहे. अशा या अत्यंत गहन स्वरुपाचा छडा लावण्याचा ज्ञानेश्वरांनी प्रयत्न केला, तर अनुभवाने निष्कर्ष निघाला की, ते रुप आपल्या हृदयातच स्वयंभू उभे आहे आणि बाहेर दिसते तेही त्याच्याच पडताळ्याचे आहे. ह्या दृष्टीने पाहू जाता माझे अंतरंग पालटून गेले. मग मला दिसला तो सर्व गुणांनी भरलेला, जीवन-स्वरुप, आनंद मूर्ती, चिंतनाच्या पलीकडे आहे असा ईश्वर. जो जड, चेतन आणि शून्य या तिन्हींना व्यापून राहिलेला भक्तांचा लाडका विठ्ठल आहे, तोच ईश्वर तुमच्या माझ्या हृदयात आहे.
|| राम कृष्ण हरी || भवःतू सब मंगलम ||
© राजेंद्र आनंदराव शेलार
[email protected]