वारीच्या वाटेवर – सर्वात्मभाव : उत्कर्षाचा परिपूर्ण मार्ग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०७ जुलै २०२२ । फलटण । प्रेम ही ईश्वरविभूती आहे. वारकरी सांप्रदायाचे आराध्य असलेला श्री. विठ्ठल म्हणजे साक्षात प्रेमस्वरुप आहे असे सगळ्याच संतांचे वचन आहे. म्हणूनच त्याच्या दरबारात भेद नाही आणि सर्वांप्रती समभाव हे त्याचे ब्रीद आहे. श्री. विठ्ठलाची निस्सीम भक्त असलेली कान्होपात्रा त्याचे वर्णन करताना म्हणते ‘माझ्या जीवीचे जीवन तो हा विठ्ठल निधान,
उभा असे विटेवरी वाटे प्रेमाची शिदोरी’ जगण्यासाठी जशी अन्न, पाणी या भोजनाची शिदोरी आवश्यक आहे तव्दत सुखी, समाधानी, आनंदी जगण्यासाठी प्रेमरसाची शिदोरी गरजेची आहे. कान्होपात्रा म्हणते त्या शिदोरीचे गाठोडे उघडून बसला आहे माझा पांडुरंग. या आणि लुटून न्या ही प्रेमाची शिदोरी; त्यातच तुमचे व जगाचे कल्याण आहे.

आपल्या मनातील सर्वात्मभाव हे जीवनातील यशाचे महत्वाचे अंग आहे. त्यासाठी दुसऱ्यांवर प्रेम करणे आणि आपण दुसऱ्यांच्या प्रेमाचा विषय होणे हेच जीवनातील मुख्य साध्य असले पाहिजे. जगण्याची अंतिम इच्छा जर सुख असेल तर अगोदर यश मिळवले पाहिजे. यशाने अनेक साधने प्राप्त होतील आणि त्या साधनांव्दारे सुख मिळवता येईल. व्यवहारी जगातील सुखाचा सिध्दांत इतका साधा-सोपा आहे. बोलायला सोपा वाटला तरी सर्वांविषयी एकच-एक ममत्वभाव मनात आणणे व तो सतत जागृत ठेवणे हे मोठे जिकिरीचे काम आहे बरं ! मनाला तो विषय सहज पचनी पडत नाही. तुमच्या मनावर जोपर्यंत प्रेमाचे संस्कार होत नाहीत तोपर्यंत मनातला दुजाभाव नष्ट होत नाही. मित्रांनो, वेदांत असे सांगतो की, ‘जो प्रेम भांडारी होईल, त्याच्या कीर्तीचा झेंडा त्रिभुवनात लागेल.’

सर्वात्मभाव स्पष्ट करण्यासाठी संत खूप सुंदर दृष्टांत देतात. शरीर जिवंत राहण्याकरिता हाताने शरीराच्या इतर अवयवांवरही प्रेम केले पाहिजे. इतर अवयवांशी तो फटकून वागला आणि माझ्या कमाईचा फायदा इतर अवयवांनी, सर्व शरीराने का घ्यावा असा अहंकारमुलक स्वार्थी विचार त्याच्यात आला तर तो ‘हात’ नाश पावेल. कारण शरीरच नष्ट झाले तर हाताचे अस्तित्व कसे राहील? त्या हाताला स्वतः जिवंत राहायचे असेल तर त्याने संपूर्ण शरीराप्रती ममत्वभाव बाळगणे हेच त्याच्या हिताचे आहे. तव्दत आपण म्हणजे सृष्टीच्या व्यापक रुपातील एक तृणवत अवयव किंवा अंश आहोत. ही सगळी सृष्टी जेंव्हा सशक्त, सुदृढ होईल तेंव्हाच सारेच सुखी होतील. आपण त्या सुखापासून अलिप्त नसू कारण त्या सुखमय सृष्टीचा आपणही एक अंश आहोत. निसर्गाकडून खूप शिकण्यासारखे आहे. निसर्ग आपल्याला सर्वात्मभावाचे दर्शन घडवत असतो. ते दर्शन घेण्याची दृष्टी आपल्याजवळ असली पाहिजे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी सृष्टीचे पालन-पोषण होते. ही पंचतत्वे कोणाहीप्रती दुजाभाव ठेवत नाहीत. पृथ्वी कधी कोणाला इथे नांदण्यास नकार देत नाही. पाणी कोणताही भेद न करता तहानेने व्याकुळ असलेला मग तो वन्यजीव असो अथवा मनुष्यप्राणी; पाणी सर्वांची तहान भागवते. प्रकाश सृष्टीवरील सर्वच अंधार नाहीसा करतो. हवा सर्वांना मनसोक्त श्वास घेऊ देते. आकाश सर्वांचा सांभाळ करते आणि सर्वांना मुक्त विहार करु देते. पंचतत्वाचा हा सर्वात्मभाव हीच ईश्वराची प्रचिती आहे.

अखिल विश्वाशी तादात्म पावणे ही प्रेमाची अनुभूती आहे. प्रेम प्रेम म्हणजे तरी काय ? आपल्या सभोवतीचा निसर्ग, आपले शेजारी आणि ज्या ज्या लोकांशी आपला संबंध येतो ते सर्व आपणच आहोत तथा आपलीच ती रुपांतरे आहेत हा अनुभव करुन घेणे व हे तत्त्व प्रत्यक्ष व्यवहारात आणणे याचेच नाव प्रेम. अखिल विश्व आपण आहोत, प्रत्यक्ष ईश्वर आणि आपण एकच आहोत हा अद्वैत सिध्दांत आचरणात आल्याशिवाय मनात सर्वात्मभाव निर्माण होत नाही. अखेरीस एक गोष्ट आपल्या लक्षात येते, ती म्हणजे हा सर्व मनोव्यापार आहे. मनाला जे वाटते तशी क्रिया मनुष्य करतो. म्हणून मनाची मशागत महत्वाची आहे. ‘मनी वसे ते जनीं दिसे’ असे एका ग्रंथकाराने म्हटले आहे. तुमच्या मनात द्वेषबुध्दी धराल तर तुम्हाला सर्वत्र व्देषच आढळेल. तुमचे मन प्रेमाने भरुन गेले असेल तर जिकडे तिकडे प्रेमच प्रेम तुमच्या नजरेस येईल. साधकांनो, मनावर होणारे संस्कार हा संगतीचा प्रभाव असतो. संतांची संगत हीच हा भवसागर पार करण्याची नाव आहे. ‘परिसाचेनि संगे लोह होय सुवर्णं, तैसा भेटे नारायण संतांसंगे.’ नामदेव महाराज संतांच्या परीस स्पर्शाचा दाखला देऊन कळवळून विनंती करतात की, संतांची संगत करा, तुमच्या मनुराजाला संस्कारित करण्याचे तेच एक साधन आहे..
संतसंगतीचे काय सांगूं सुख । आपण पारिखें नाहीं तेथें ॥
साधु थोर जाणा साधु थोर जाणा । साधु थोर जाणा कलियुगीं ॥
इहलोकीं तोचि सर्वांभूती सम । शरीराचा भ्रम नेणे कदा ॥
नामा म्हणे गाय दूध एक सरे । साधु निरंतर वर्ते तैसा ॥

आपल्या मनातील प्रेमभाव आणि अंतःकरणातला सर्वात्मभाव हाच जगाच्या सर्वांग सुखाचा मार्ग आहे. त्यासाठी संत संगत करा, ते तुम्हाला प्रेम भांडारी बनवतील.

राम कृष्ण हरी.
भवःतू सब मंगलम !

© राजेंद्र आनंदराव शेलार
rajendra.shelar1@gmail.com


Back to top button
Don`t copy text!