
दैनिक स्थैर्य । दि. २२ जून २०२२ । सातारा । कोरोना काळातील दोन वर्षांच्या सक्तीच्या विश्रांती नंतर होत असलेल्या पायीवारीसाठी वारकऱ्यांची अलोट गर्दी लोटली आहे. देहू पासून आळंदी पर्यंतचा इंद्रायणी काठ ज्ञानोबा-तुकाराम या नाम घोषांनी निनादला आहे. प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर सात्विकभाव विलसत आहेत. त्यांना वेध लागलेत पंढरीश परमात्म्याच्या दर्शनाचे पण मुखातून गजर सुरु आहे संतांच्या नावाचा. वारकरी संप्रदायाचे हे वेगळेपण आहे. मनात परमेश्वराच्या भेटीची आस असली तरी हा प्रवास संत, सद्गुरुंच्या सोबत, त्यांनी दाखवलेल्या विचारवाटेवरुनच पूर्ण होईल हा ठाम विश्वास येथे प्रत्येकाच्या मनात आहे. यातही गंमत अशी आहे की, पंढरपूरात पोहोचल्यानंतर ज्याच्या भेटीसाठी एवढी पायपीट केली त्या विधात्याचे, श्री.विठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन होईलच याची काही खात्री नाही. पण पंढरपूरच्या पवित्र मातीला पाय लागले, चंद्रभागेत स्नान झाले की श्री.विठ्ठलाचे दर्शन झाले ही त्याची मनोमन भावना आहे. “नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळिया, सुख देईल विसावा रे” हा वारकऱ्यांचा दृढ विश्वास आहे.
इंद्रायणीच्या तीरावर आज अवघा महाराष्ट्र एकवटला आहे. जिकडे पाहावे तिकडे वैष्णवांचा मेळा नजरेस पडतो. चांद्या (विदर्भ) पासून बांद्या (कोकण) पर्यंतची मराठी संस्कृती आज इंद्रायणीच्या तीरावर विसावली आहे. महाराष्ट्र किती विविधतेने नटलेला आहे हे येथे प्रकर्षाने जाणवते. तीच मराठी भाषा पण प्रत्येकाच्या भाषेची लय वेगळी, शरीराची ठेवण वेगळी, कपड्यांची रचना वेगळी. विशेषतः महिलांमध्ये हा बदल प्रकर्षाने जाणवतो. मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा सात्विक भाव एकच आहे. पांढराशुभ्र पोशाख हे वारकरी संप्रदायाचे आणखी एक वैशिष्ठय आहे. पांढरा पायजमा किंवा धोतर, पांढरा शर्ट आणि डोक्यावर पांढरी गांधी टोपी. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पसरलेला पांढराशुभ्र जनसागर आणि त्यामध्ये ठिकठिकाणी रंगबिरंगी साड्या नेसलेल्या, नटूनथटून सहभागी झालेल्या स्त्रिया. हे दृष्य पाहणाऱ्याला वेगळाच आनंद मिळतो. येथे कोण कोणाची जात विचारत नाही, कोण कोणाचा धर्म विचारात नाही. गरिबी आणि श्रीमंतीचा बडेजाव नाही. वैष्णव वारकरी ही एकच ओळख येथे पुरेशी असते.
श्रीगुरु दत्तात्रय महाराज कळंबे मठावर जवळपास हजार बाराशे वारकरी दाखल झाले आहेत. सर्वांच्या सेवा सुविधेसाठी धावपळ सुरु आहे. मंडळाचे कार्यकर्ते श्रम घेत आहेत. त्यातच माझी प्रकृती थोडी नाराज झाली आहे. श्री.माऊलींच्या प्रस्थानाची एवढी धामधूम आहे की, लेख लिहिणे शक्य होईल असे वाटत नव्हते. परंतू संकल्प पूर्ण करायचा म्हणून हा छोटासा प्रयत्न. उद्या विस्ताराने लिहिता येईल.. क्षमस्व.
|| भवःतू सब मंगलम | राम कृष्ण हरी ||
© राजेंद्र आनंदराव शेलार
[email protected]