
दैनिक स्थैर्य । दि. ०५ जुलै २०२२ । फलटण । वारीच्या वाटेवर लेखमाला लिहिण्याचे मनात आले तेंव्हा असा विचार होता की, ज्ञानेश्वर आणि तुकाराम या संतांच्या पालखी सोहळ्यांचे दर्शन त्यात प्रतिबिंबित व्हावे. या सोहळ्या सोबत अवघा महाराष्ट्र पंढरीश परमात्म्याच्या दर्शनासाठी आतुरतेने मार्गक्रमण करीत आहे. त्या वाटेवरच्या अनुभवांचे, चालणाऱ्या वारकऱ्यांचे भावविश्व त्या लेखांमध्ये वर्णावे. ज्ञानोबा – तुकोबा जी प्रेरणा देतील ते शब्दरुपाने व्यक्त करावे अशीही एक धारणा मनामध्ये होती. आज बारावे पुष्प गुंफीत असतानाचा अनुभव असा आहे की, लिहायला प्रारंभ करताना मन गोंधळलेले असते पण क्षणात त्याला चालना मिळते आणि मनातला विषय शब्दपटलावर आकार घेऊ लागतो. ही प्रेरणा म्हणजे संतकृपेचा, श्रीगुरुंचा प्रसाद आहे अशी माझी भावना आहे.
‘मन करा रे प्रसन्न सर्व सिध्दीचे कारण’.. हे आपण लहानपानापासून ऐकत आलो आहोत. पण मन कसे प्रसन्न करायचे हा आपल्यापुढे प्रश्न असतो. काही मनासारखे घडले, आवडीचे प्राप्त झाले किंवा एखाद्या गोष्टीत यश मिळाले की आपले मन आनंदी होते व मनाला विशेष प्रसन्नता लाभते. पण ही प्रसन्नता दीर्घकाळ टिकणारी नाही. पुढच्या काही घटनांनी ती प्रसन्नता लुप्त पावते. चिरकाल टिकणारी, सदोदित आनंद देणारी मनाची प्रसन्नता प्राप्त व्हावी ही आपली प्रत्येकाची धारणा आहे. अस्वस्थ मन नानाविचारांनी ग्रासून जाते, ते आपल्या व इतरांच्या भावनांची मर्यादा ओलांडते, त्या मनामध्ये अविचार बळावू लागतो. मग ते अनाचाराकडे वळते. भारतीय अध्यात्म असे सांगते की ‘जे पिंडी ते ब्रह्मांडी.’ या तत्वातून फार व्यापक अर्थ प्रगट होतात. परंतू त्याकडे न वळता आपण मर्यादित स्वरुपात त्याचा विचार करु. पिंड हा शब्द आपला आत्मा अथवा मन या अर्थाने घेतलेला आहे. आपले मन जर दुःखी असेल तर सारे जग दुःखी वाटू लागते, आपल्या मनात हिंसाचार असेल तर जगातील हिंसक घटनाच लक्ष वेधून घेतात, आपल्या मनात अहंभाव असतो तेंव्हा सगळ्या जगात अहंकार भरलेला आहे असे वाटू लागते. मन कमकुवत असल्याची ही लक्षणें आहेत. तुम्ही म्हणाल अपराध करणारा धाडसी असतो असे मानले जाते. म्हणजे त्याचे मन समर्थ असले पाहिजे! मित्रांनो, वस्तुस्थिती वेगळी आहे. दुबळ्या मनाचे लोकच अनामिक भीतीपोटी स्वार्थी बनतात व मग त्यांच्या हातून अपराध घडतो. स्वैर वागायला फारसे सामर्थ्य लागत नाही. पण तत्वाने, न्यायाने, धर्माने, चांगल्या विचाराने वागायला फार मोठे सामर्थ्य लागते. महात्मा गांधी म्हणाले होते ‘दुबळे कधीच क्षमा करु शकत नाहीत. क्षमाशीलता हा बालवानांचा गुण आहे’. कोणत्याही बिकट प्रसंगात विचलित न होता विनयाने वागण्यासाठी सामर्थ्यशील मनच उपयोगी पडते. एखाद्यावर दया करणं, त्याला क्षमा करणं हे दुबळ्या माणसाचे काम नाही. त्यासाठी मनाने व विचारांनी तो समर्थच असावा लागतो. ज्याच्या मनामध्ये दयेचा पाझर आहे तेथे धर्माचे अस्तित्व आहे. किंबहूना दया, क्षमा, शांती हीच ईश्वराची, धर्माची प्रतीती आहे. जेथे धर्मनिती आहे तेथे सुख, समाधान, यश आहे. आणि तीच मनाची शाश्वत प्रसन्नता आहे. ‘दया तेथे धर्मु | धर्मु तेथे सुखागमु | सुखी पुरुषोत्तमू | आथी जैसा || हे सांगताना संत ज्ञानेश्वरांनी मनाची ही पूर्वपीठिका नक्कीच अभ्यासली असेल.
मन सामर्थ्यशाली बनवण्यासाठी स्वामी विवेकानंद म्हणतात.. ”मनात एक कल्पना करा, ती कल्पनाच तुमचे जीवन बनवा. तीच्या बाबत विचार करा, तिचीच स्वप्ने बघा, त्या कल्पनेवरच जगा. तुमचा मेंदू, स्नायू, नसा, तुमच्या शरीरातील प्रत्येक भाग त्या कल्पनेने भरुन जाऊ दे. बाकी कोणत्याही कल्पनेच्या वाटेला जाऊ नका. हाच मन सामर्थ्याकडे पर्यायाने यशाकडे जाणारा मार्ग आहे.” मानवी जीवन हे अत्यंत गतिमान आहे. मानवाची विचार प्रक्रियाही वेगवान आहे. या गतीला, वेगाला सुसंगत होण्यासाठी सामर्थ्यवान मनाची गरज आहे. मनाची जडणनघडण संस्कारातून होत असते. धर्म आणि संस्कृती तसेच तत्वज्ञान ही उत्क्रांत मानवी जीवनाची प्रधान अंगे आहेत हे कृपया समजून घ्या. या अनुषंगाने सारंगपूर येथील अक्षरधाम मंदिरात श्रीगुरु प्रमुखस्वामी महाराजांना भेटल्यानंतर माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेली कविता माझ्या मनाला खूप भावली. त्या कवितेत डॉ. कलाम म्हणतात..
तुमचे प्रयत्न, तुमची चिकाटी आणि तुमची वृत्ती
यामुळेच तुम्हाला
अन्य कोणीही बरोबरी करु शकणार नाही
असे स्थान प्राप्त झाले आहे.
प्राचीन काळचे सूर्य तुमच्यात परत येतात,
ते त्यांच्या भ्रमणकक्षेत उंचावर गेले,
तरी कधीही
प्रकाश बाहेर टाकण्याचे थांबणार नाहीत.
मला असे वाटते ‘आपण लोकांना काहीही शिकवू शकत नाही. आपण त्यांना केवळ त्यांच्या अंतरंगात पाहण्यासाठी मदत करु शकतो’. संतांनी तेच कार्य केले. आज संतांच्या विचारांची पालखी वाहत असतांना अथवा त्यांच्या सोहळ्यासोबत ईश्वरी तत्वाच्या शोधात मार्गक्रमण करीत असताना तुम्ही-आम्ही लोकांच्या मनातील भाव-भावना समजून घेतल्या पाहिजेत. आजच्या जगामध्ये एक नव्या बुद्धिवंतांचा वर्ग निर्माण होत आहे. नीती, अनीती, मनाचे संस्कार आणि अध्यात्मतत्व यापुढे त्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. विशेषतः तरुणपिढी त्या नव्या विचारांकडे वेगाने आकर्षित होत आहे. अशावेळी आपला गतकालीन वैभवशाली वैचारिक इतिहास व आपली संस्कार परंपरा या वर्गाला पटवून द्यायची आहे. संत साहित्याच्या कालातीत विचारांचे महत्व त्याला समजावून सांगायचे आहे. पण वर्तमानकाळात त्या गत इतिहासातील काळानुरुप घडलेल्या परिवर्तनाचा अभ्यास करुन आजच्या जीवनासाठी असलेली त्याची आवश्यकता या वर्गाला सांगायला हवी. प्राचीन इतिहास ही केवळ आपली अस्मिता नाही तर ते जगाच्या कल्याणाचे तत्वज्ञान आहे याची प्रचिती त्यांना दाखवावी लागेल. त्यातून नक्कीच प्रेरणा मिळेल आणि विद्यमान जीवनाला मार्गदर्शनही घडेल.
अगदी अलीकडच्या काळात बहिणाबाई चौधरी या आजच्या जगाच्या दृष्टीने अशिक्षित असलेल्या एका सामान्य महिलेने जनमनाची विवशता आणि स्वतःच्या सामर्थ्यशाली मनाची अवस्था अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. लोकांना त्याचाही दाखला द्यावा लागेल. सुंदर जगाच्या निर्मितीसाठी अगोदर स्वतःला सुंदर बनवावे लागेल. तुम्हाला जो बदल जगामध्ये घडवायचा आहे, तो आधी तुमच्यात घडवा. त्यासाठी अध्यात्म आवश्यक आहे. आपले संत सांगतात.. “आनंद व सुख हे मालकीमध्ये नाही वा सोन्यानाण्यामध्ये नाही. सुख-समाधान हे आत्म्यात, मनातच वास करीत असते. जे मन स्थिर आहे त्याला सर्व जग शरण जाते.”
प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या मनाची प्रसन्नता ही विश्वाच्या सुखाला कारणीभूत ठरेल असे आपले अध्यात्म सांगते. मन अध्यात्माकडे वळवण्यासाठी संत संगत करावी लागेल. एकदा का मन संतांच्या संगतीत आले की, ते ईश्वराच्या ध्यानात रंगून जाईल. अशा रंगून गेलेल्या मनाची प्रसन्नता कधीही संपणार नाही. सुंदर जगाच्या निर्मितीचे तेच एक ठिकाण आहे.
राम कृष्ण हरी.
भवःतू सब मंगलम !
© राजेंद्र आनंदराव शेलार
[email protected]