दैनिक स्थैर्य । दि. २२ जून २०२२ । सातारा । जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. किंबहूना त्याची सततची धडपड ही सुखासाठीच असते. या प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगवेगळी असेल, त्यासाठीचे मार्गही नानाविध असतील. मात्र अंतिमतः सुख प्राप्ती हेच त्याचे उद्दिष्ट असते. आयुष्यभराच्या कष्टप्रद श्रमानंतर त्याला ते सुख प्राप्त होतेच असे नाही. साध्य, साधन आणि साधना यांचा मिलाप झाल्यानंतरही सुख हुलकावणी देते आणि मग आपण सहजपणे म्हणतो, खूप प्रयत्न केले पण यश आले नाही. हे अपेक्षित यश म्हणजेच सुख असते. एवढ्या प्रयत्नांतीही ते का बरं सापडत नाही ? तुमच्या माझ्या मनाला या प्रश्नाने भेडसावले आहे. पण जोपर्यंत आपली सुखाची कल्पना साकार रुप धारण करीत नाही तोपर्यंत सुख प्राप्ती नाही याची खात्री बाळगा.
सुख इतके दुर्मिळ असतानाही चैतन्यात्मक विचारधारेचे महान संत नामदेव महाराज म्हणतात _
सुखालागी करिसी तळमळ | तरी तू पंढरीसी जाय एक वेळ || तेणे तू अवघाचि सुखरुप होसी | जन्मोजन्मीचे दुःख विसरसी ||
श्री. नामदेवांसारखा प्रतिभासंपन्न विचारवंत अधिकार वाणीने सांगतो की, तुला सुख हवे आहे ना! मग तू एकवेळ पंढरपुराला जा. सारे सुख तूझ्या पायावर लोळण घेईल. पंढरीच्या दर्शनाने तू अवघाचि म्हणजे अंतर्बाह्य सुखी होशील आणि तुझे अनेक जन्मांचे दुःख नाहीसे होईल. सुखाचे साकार रुप तुला पंढरपुरात भेटेल. मग जीवाची तळमळ संपून जाईल आणि तू स्वतःच सुखाचे रुप धारण करशील. या अभंगातील संत नामदेवांची भाषा आत्मविश्वासाची, ठामपणाची आहे. तरीही भाषेचे मार्दव विलक्षण आहे. आपल्या अंतःकरणाचा ठाव घेणारी आणि मनाला शांत शीतल करणारी ही भाषा आहे. अभंग ऐकता-वाचतानाच खात्री पटते व आपली पावले पंढरपूरच्या दिशेने पडू लागतात.
ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास या संत पंचकाने मराठी जगताला विलक्षण मोहिनी घातली आहे. मराठी मातीला आणि मराठी सारस्वताला समृध्द करणारे हे संत पंचक म्हणजे मराठी माणसांचा श्वास आहेत. या संत पंचकाने मांडलेल्या विचारांवर आपली नितांत श्रध्दा आहे. निष्ठेने आपण त्याचे पालन करतो. मग दुर्मिळ असलेले सुख पंढरपुरी सापडेल हा नामदेवांचा संदेशही आपण शिरोधार्य मानला. सज्जन हो, या अभंगातील पंढरपूर हे सुखाचे प्रतीक आहे. पंढरीश परमात्मा श्री.पांडुरंग आणि त्याला विटेवर उभा करणारा भक्त पुंडलिक यांनी आपल्या जीवन चरित्रातून सुखाची परिभाषा प्रगट केली आहे. सुखाची संतुष्टी ही मनाच्या व आत्म्याच्या आनंदाशी निगडीत आहे. मन आणि आत्मा (चित्त) जिथे स्थिर होईल तेथे सुख आहे. अन्यथा ऐश्वर्याच्या ढिगाऱ्यावर लोळणारा कुबेर आणि भूलोकांवर राज्य करणारा राजाही सुखी नाही. कारण त्यांचे मन स्थिर नाही आणि चित्त शांत नाही. अधिकच्या खजिन्यासाठी दोघेही दुःखी आहेत. मनाला व चित्ताला स्थिर, शांत करणारे जे आहे ते सुखाचे आगर आहे. पंढरपूर हे त्याचे प्रतीकात्मक रुप आहे.
तुकोबाराय म्हणतात, सुख पाहता जवा ऐवढे, दुख पर्वता ऐवढे. त्याच्याही पुढे जाऊन महाराज म्हणतात, संसारात सुख नाही. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. महाराजांनी येथे वापरलेली संसाराची भाषाही नीट समजून घेतली पाहिजे. केवळ कुटुंब आणि प्रपंच म्हणजे संसार नाही. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय इथपर्यंतचा सारा व्याप हा संसाराचाच एक भाग आहे. या संसारात एक गोष्ट प्राप्त झाली की दुसरी खुणावत राहते. हा सारा संसार मायेने व्यापलेला आहे. अवतीभवती थाटलेला मायेचा बाजार आपल्याला कधीच तृप्तीची संगत करु देत नाही आणि अतृप्त मन कधी आनंदी, समाधानी राहात नाही. सुखाची तर वार्ताच नको. हे विश्व् म्हणजे एक प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनात नानाविध वस्तू मांडल्या आहेत. त्यातील कितीही प्राप्त झाल्या तरी प्राप्त न झालेल्या एकीसाठी मन व्याकुळ होते, अशांत होते. तेच दुःखाला कारण ठरते. म्हणून मन व चित्त प्रदर्शनातून काढून दर्शनात गुंतवणं हाच एक उपाय शिल्लक राहतो.
सुखाचेही प्रकार सांगितले जातात. शाश्वत सुख आणि अशाश्वत सुख. जे शाश्वत, चिरंतन आहे ते पारमार्थिक सुख आणि जे अशाश्वत, तात्पुरते आहे ते भौतिक सुख असे म्हटले जाते. पण मला वाटते सुख हे सुखच असते, मग ते भौतिक असो अथवा पारमार्थिक. त्याची प्राप्ती हीच जीवाची तळमळ असते. म्हणून ते मिळणे महत्वाचे. आपण सुरुवातीलाच असा विचार केला की, मन आणि चित्त स्थिर असेल तर सुखाची प्राप्ती हमखास होते. मन आणि चित्त एकाच ठिकाणी स्थिर होतात, ते म्हणजे ईश्वराचे चरणकमल. त्या चरणकमलांची ओळख होते संतांमुळे, सद्गुरुंमुळे. संत आपल्या बुध्दीतील ज्ञानज्योती प्रज्वलित करतात आणि हृदयात प्रेमाचे सिंचन करतात. तेंव्हा ज्ञानदेवांच्या मुखातून शब्द उमटतात.. गुरु तेथे ज्ञान | ज्ञानी आत्मदर्शन | दर्शनी समाधान | आथी जैसे || समाधान हे तृप्तीच्या दिशेने पडलेले पाऊल आहे. या सर्व विचारांच्या शीर्षस्थानी पंढरी क्षेत्र आणि पंढरीश परमात्मा श्री. विठ्ठल आहे. तुकोबाराय त्याचे वर्णन करताना म्हणतात.. चतुरा तो शिरोमणी, बहू आहे करुणावंत, अनंत हे नाम ज्याचे.! चैतन्य स्वरुप भगवान परमात्मा श्री. विठ्ठलाच्या दर्शनाने सुख मिळेल हा विश्वास देताना नामदेव महाराज म्हणतात.. सुखालागी करिसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एकवेळ!
हा लेख लिहीत असताना तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होऊन तो पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे.
ता. क. – श्री. ज्ञानेश्वर माउलींच्या दर्शनासाठी मंदिराकडे जात असताना सवयीने पावले इंद्रायणीकडे वळली. पण आजचे इंद्रायणीचे दर्शन मनाला वेदना देणारे होते. प्रचंड दूषित झालेले, फेसाळलेले काळपट पाणी दूरवर दुर्गंधी पसरवत होते. आपण तीर्थक्षेत्रातील नद्यासुध्दा सुरक्षित ठेऊ शकलो नाही हे दुर्दैवाने नमूद करताना माझ्या सारख्या निसर्गप्रेमी वारकऱ्याला झालेले दुःख शब्दातीत आहे.
|| भवःतू सब मंगलम | राम कृष्ण हरी ||
© राजेंद्र आनंदराव शेलार
[email protected]