दैनिक स्थैर्य | दि. १० जुलै २०२४ | फलटण |
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने सामाजिक वनीकरण, फलटण प्रादेशिक वनविभाग आणि फलटण नगरपरिषद यांच्या सहकार्याने ११ जुलै ‘जागतिक लोकसंख्या दिना’निमित्त ‘कै. अच्युत दत्तात्रय स्मृती हरित वसुंधरा उपक्रम’ राबविण्यात येत आहे. यावेळी १ लाख झाडांची (रोपे आणि सिड बॉल) लागवड करून ती टिकविण्याचा संकल्प करायचा आहे.
फलटण डॉक्टर असोसिएशन, मुधोजी क्लब फलटण, वाठार निंबाळकर वसुंधरारक्षक, नेचर अँड वाइल्डलाईफ वेलफेअर सोसायटी, ग्लोबल अर्थ फाउंडेशन, गोविंद फाउंडेशन फलटण, आणि समस्त निसर्ग रक्षक फलटण परिसर यांच्या मदतीने आपला गाव वृक्षोत्सव, हर घर झाड उपक्रमाद्वारे आपल्या आवडीची किमान पाच देशी झाडे आपल्या परिसरात व आपल्या दारात स्वखर्चाने लावून त्याची योग्य ती जोपासना करण्यासाठी सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन फलटण व परिसरातील नागरिकांना करण्यात आले आहे.
या वृक्षोत्सवाचा शुभारंभ डॉ. किरण नाळे यांच्या हॉस्पिटल शेजारील ओपन स्पेस, इरिगेशन कॉलनी, लॉ कॉलेजसमोर, रंगारी महादेव मंदिराजवळचे नदीपात्र, वाठार निंबाळकर ज्योतिबा मंदिराजवळ, हिंगणगाव ग्रामपंचायती अखत्यारीत जागा आणि गोविंद फौंडेशनतर्फे फलटणजवळील पन्नास छोटी मोठी गावे इ. ठिकाणी रोपांची लागवड आणि सिड बॉल रुजवून करण्यात येणार आहे.