दैनिक स्थैर्य | दि. २४ मार्च २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालयात सांस्कृतिक कार्य संचालनालय, राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र शासन, आर्टिस्टिक ग्रुप व मुधोजी महाविद्यालय आयोजित ‘आझाद हिंदची गाथा’ मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १००० पेक्षा अधिक विद्यार्थी, ७५ महाविद्यालये, ७५ स्थळे, ७५ नाट्यप्रयोग एकाच वेळी सादर करण्याची ही ऐतिहासिक घटना आहे. यात महाराष्ट्रातील ७५ महाविद्यालयात मुधोजी महाविद्यालयाचा समावेश आहे. त्यामुळे २३ मार्च, शहीद दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महिलांचे योगदानाबद्दल कृतज्ञता व आदरांजली व्यक्त करण्यासाठी कु. सायली काळूखे ह्या विद्यार्थिनीने ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ ही व्यक्तिरेखा सादर करून या नाट्यप्रयोगाद्वारे अगदी जाज्ज्वल्य देशभक्तीचे प्रकटीकरण करत जिवंत अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली व हरहर महादेव गर्जनेने प्रयोगाची सांगता केली.
कु. स्नेहलता बिचुकले हिने ‘दगडाबाई शेळके’ यांची व्यक्तिरेखा साकारली व रजकारांच्या राजवटीतून मराठवाडा मुक्ती संग्रामात हिरिरीने लढा देऊन आपले योगदान देणार्या करारी व धाडसी व पराक्रमी व्यक्तिमत्वांचे नाट्यप्रयोगाद्वारे सादरीकरण केले. अशा प्रकारे स्वातंत्र्यसंग्रामातील शूर महिलांच्या कर्तृत्वाला उजाळा व आदरांजली अर्पण करण्याचा हा अनोखा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करून इतिहासाला उजाळा दिला.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. पी. एच. कदम सरांनी सहभागी विद्यार्थीनींचे अभिनंदन केले व या स्तुत्य उपक्रमात उत्तम सादरीकरण करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर टाकली, असे मत व्यक्त केले.
सहभागी कलाकारांना कलाविष्कार विभागप्रमुख प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर, प्रा. विशाल गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमप्रसंगी प्रा. डॉ. सौ. सरिता माने, प्रा. ज्योत्स्ना बोराटे, प्रा. डॉ. सीता जगताप, प्रा. नीलम देशमुख, प्रा. मोनिका शेंडे, प्रा. पितांबरी सपाटे, प्रा. गायकवाड, प्रा. नाळे व प्रा. ललित वेळेकर यांनी उपस्थिती दर्शवली.