दैनिक स्थैर्य | दि. ८ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी भक्ती शक्ती योग फाऊंडेशन, हडपसर, पुणे यांच्या वतीने फलटण नगर पालिका येथील महात्मा फुले चौक ते मालोजी राजे पुतळा तहसील कार्यालय परिसरामध्ये ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
स्वच्छ पर्यावरण हे केवळ नागरी कर्तव्य नाही तर ती एक नैतिक जबाबदारी आहे. तसेच समाजहित जोपासण्यासाठी असे उपक्रम सामाजिक संस्थांनी राबविणे ही काळाची गरज आहे. भक्ती शक्ती योग फाऊंडेशनचे संस्थापक श्री. किशोर जेधे, इतर विश्वस्त, संस्थेचे सभासद व स्वयंसेवक, तसेच श्री. तेजश पाटील, सी.ओ. नगरपालिका फलटण, श्री. तुषार गुंजवटे, नायब तहसीलदार, फलटण, स्वच्छता निरीक्षक श्री. प्रकाश तुळसे व त्यांचे कर्मचारी, फलटण बिल्डर असोसिएशनचे सदस्य, पंचायत समिती फलटण येथील कर्मचारी हे स्वच्छ भारत अभियानात सामील झाले होते.
यावेळी नगरपालिकेतर्फे झाडू, मास्क, हँडग्लोज, सर्वांना मोफत नाष्टा व चहाची सोय उपलब्ध करून सहकार्य करण्यात आले. भक्ती शक्ती योग फाऊंडेशनतर्फे संस्थेच्या वतीने रोप वाटप करून उपस्थित असणार्या मान्यवरांचे आभार मानण्यात आले. सिद्ध समाधी योग, फलटण ग्रुप यांच्यातर्फे या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.