स्वर्गीय राजीव गांधी स्मृतीदिनानिमित्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


राजीव गांधी हे भारताचे सातवे पंतप्रधान होते. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले तिसरे पंतप्रधान होते. इंदिरा गांधींच्या निधनानंतर 31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989 पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते.

जेव्हा राजीव गांधींनी पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतली, तेव्हा ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी इंडियन एअरलाइन्समध्ये वैमानिक होते. आई इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान असल्या तरी, त्यांनी मात्र राजकारणातून दूर राहणे पसंत केले होते. दरम्यान इंग्लंडमधील केंब्रिज येथे असताना, त्यांची ओळख इटालियन वंशाच्या सोनियाशी झाली व पुढे त्यांचा विवाह झाला. अखेर 1980मध्ये भाऊ संजय गांधी याच्या निधनानंतर राजीवने राजकारणात प्रवेश केला. पुढे आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते 1984 मध्ये पंतप्रधान बनले.त्यांच्या चेह-याकडे पाहिल्यावर ‘चैतन्य’ असे अगदी सहजपणे म्हणता येईल, असा राजीव गांधींचा चेहरा होता. राजकारणात येण्याची त्यांची इच्छा नव्हती. आई पंतप्रधान असतानाही ते इंडियन एअर लाईन्समध्ये पायलट म्हणून काम करत होते; पण परिस्थिती ओढाळ असते. राजकारणातील परिस्थिती कोणाला, कसे आणि कुठे वाहवत नेईल, याचा अंदाज कोणीच करू शकत नाही. त्यामुळे धाकटा भाऊ संजय यांच्या अपघाती मृत्युमुळे राजीव गांधी यांना राजकारणात यावे लागले.

पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी एकाकी पडल्या. मानसिक संघर्ष करून राजीव गांधी यांनी मनाच्या विरुद्ध राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. परिस्थितीपुढे नाईलाज होतो. त्यांच्या पत्नी सोनियाजींनी विस्ताराने लिहिलेल्या एका लेखात राजीव राजकारणात जाणार तेव्हा झालेली पती-पत्नीची मानसिक घालमेल अतिशय हृदयस्पर्शी शब्दात व्यक्त केली आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर तर राजीव गांधी यांच्या जीवाला धोका आहे, हे गांधी-नेहरू कुटुंबीयांनी गृहीतच धरलेले होते. एकाकी पडलेल्या इंदिराजींना सावरण्यासाठी राजीवजी देशाचे पायलट बनले. संजय गांधी यांच्या अपघाती मृत्यूनंतर राजीवजी राजकारणात उतरले. काँग्रेसचे सरचिटणीस झाले. काँग्रेसमध्ये आल्यानंतर संजय गांधी ज्या मतदारसंघाचे खासदार होते त्या अमेठी मतदारसंघातून राजीव गांधी यांनी लोकसभेची पोटनिवडणूक लढवली आणि लोकदलाचे उमेदवार शरद यादव यांचा दोन लाख मतांनी पराभव करून ते लोकसभेत प्रवेशकर्ते झाले. इंदिराजींचे प्रमुख सल्लागार आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष अशा कामांनी त्यांनी सुरुवात केली. मलईमालानगर (तामिळनाडू) येथील 1982च्या काँग्रेस अधिवेशनात राजीव गांधी यांनी राजकीय अनुभव फारसा नसताना अतिशय टापटिपीने, नेटकेपणाने अधिवेशन यशस्वी करून दाखवले. त्यांच्याबरोबर त्यावेळी अजित पांजा, अरुण नेहरू, सॅम पित्रोदा अशी तरुण मंडळी सहकारी आणि सल्लागार म्हणून काम करत होती. इंदिरा गांधींची हत्या 31 ऑक्टोबर 1984 रोजी झाली. राजीव गांधी राजकारणात येऊन वर्ष-दोन वर्षे होत नाहीत तोच हा एक प्रचंड आघात त्यांच्यावर झाला. इंदिराजींची हत्या झाल्यानंतर दिल्लीत उसळलेल्या भीषण दंगलीत पंतप्रधानपदाची शपथ घेतलेले देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान.

तेव्हा त्यांचे वय 40 होते – दिल्लीतला दंगा शांत करायला बाहेर पडले आणि पहाटे पाच वाजता घरी आले. प्रिय मातेचे कलेवर घरात असताना, व्यक्तिगत जीवनातील आईच्या मृत्यूचे दु:ख पचवून हा तरुण रात्रभर दिल्ली सावरण्याकरिता बाहेर पडला होता. राजीव गांधींच्या छोटयाशा राजकीय कारकिर्दीत ही सर्वात मोठी हृदयद्रावक अशी घटना मानावी लागेल. आईचे पार्थिव घरात असताना दिल्लीतला दंगा विझवण्याकरिता त्यांनी जीवाची बाजी लावली. हे त्यांचे काम इतिहासाला विसरता येणार नाही. इंदिरा गांधींची भीषण हत्या झाल्यानंतर राजीव गांधींनी पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारली आणि 1985साली होणारी लोकसभेची सर्वसाधारण निवडणूक त्यांनी मुदतपूर्व निवडणूक करून डिसेंबरमध्येच घेतली. पंडित नेहरूंच्या काळातही काँग्रेसला एवढे मोठे यश मिळाले नाही, असे प्रचंड यश राजीव गांधींनी काँग्रेसला मिळवून दिले. 542 पैकी काँग्रेसने 411 जागांवर विजय मिळवला. भारताच्या लोकसभेत एका पक्षाच्या विजयाचा हा विक्रमी आकडा आहे.  ‘राजीव गांधी देश कसा सांभाळू शकतील,’ अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली होती; पण जगाच्या प्रगत देशांना समोर ठेवून या देशात संगणकीय क्रांती केली पाहिजे आणि  ‘टेलिकम्युनिकेशन’ क्षेत्राला खूप मोठा बढावा दिला पाहिजे म्हणून या दोन विषयांना त्यांनी हात घातला आणि संगणकीय क्रांतीची सुरुवात भारतात त्यांनी करून दिली. त्या काळात ‘एसटीडी’ची व्यवस्था राजीव गांधींमुळे सुरू झाली. त्या विषयातले तज्ज्ञ सॅम पित्रोदा यांनी जे काम या देशासाठी करून ठेवले त्याची टिंगलही करण्यात आली;  पण आज त्या कामाची जगाने दखल घेतली आहे. आधुनिक जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर ‘कम्युनिकेशन’ आणि ‘संगणक’ ही दोन शस्त्रे अशी आहेत की, ज्यांच्या साहाय्याने जगात तुम्ही तुमचा प्रभाव पाडू शकता, हे राजीव गांधींना पहिल्यांदा कळले. त्याचवेळी काँग्रेस पक्षाला निवडणुकीत मोठा विजय मिळाला असला तरी पक्षात गटातटाचे राजकारण बांडगुळासारखे वाढलेले आहे, हे त्यांच्या लक्षात आले. 28 डिसेंबर 1985 रोजी मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या शताब्दी अधिवेशनात राजीव गांधींनी या बांडगुळांवर जोरदार हल्ला चढवला. ते त्यांचे भाषण ऐतिहासिक ठरले होते. पंडितजी आणि इंदिराजींप्रमाणेच जागतिक शांततेसाठी प्रयत्नशील असलेले राजीवजी यांनी श्रीलंकेत शांती सेना पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच निर्णयामुळे ‘लिट्टे’ या दहशतवादी संघटनेने कट करून त्यांचे जीवन संपवले. जगातल्या 32 देशांनी या लिट्टेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. राजीवजींच्या नेतृत्वाची उणीव काँग्रेसलाच नव्हे तर देशालाही भासत राहते.

आत्ता संगणकाच्या व मोबाईलच्या माध्यमातून आपण फेसबूक, व्हॉटस्अ‍ॅप आदी सोशल मिडियातून जगाला हाताच्या बोटावर नाचवत आहोत. त्या देशाच्या संगणक क्रांतीच्या प्रणेत्याच्या बलिदानाला आपण पक्षाचे पाईक…? म्हणवून घेणारे स्वयंघोषित नेते व कार्यकर्ते अभिवादनाची औपचारिकता सुध्दा पार पाडू शकत नाहीत. ज्यांच्या नावाचा जप करुन आपण इथपर्यंत पोहोचलो त्यांचे विस्मरण होण्याइतक्या यांच्या संवेदना बोथट झाल्या असतील तर सर्वसामान्यांविषयी यांचे मत काय ते न बोललेच बरे.

 राजीव गांधी यांनी या देशातल्या 18 वर्षाच्या तरुणांना मताचा अधिकार पहिल्यांदा दिला आणि त्याच तरुणांची पुढची पिढी राजीवजींच्या संगणकीय क्रांतीची आज दूत बनलेली आहे. या देशाला आधुनिक जगाबरोबर घेऊन जाण्याचा फार मोठा प्रयत्न राजीवजींनीच केला; त्या राजीवजींच्या हत्येला आज दि.21 मे रोजी 29 वर्षे पूर्ण झाली. काळ कोणाकरिताही थांबत नाही. देशही थांबत नाही. पण ज्यांनी हा देश उभा करण्याकरिता आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे, ते बलिदान कसे विसरता येईल? कोणत्याही देशात दोन पंतप्रधानांची हत्या आणि त्याहीपेक्षा मातेची आणि मुलाची हत्या असे क्रूरकर्म कुठेच घडलेले नाही. इंदिराजींना आपल्या जीवनाच्या असुरक्षिततेची जाणीव झाली असावी. संजय गांधींच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांनी पायलट असलेल्या राजीवना राजकारणात आणले आणि या राजकारणाने त्यांच्या जीवनाचा घात केला.  पण मातेच्या हत्येनंतर राजीवजींना देशाने हाक दिली. त्यामुळे मातेचे पार्थीव घरात असताना दिल्लीमध्ये उसळलेला दंगा थांबवायला, हा तरुण पंतप्रधान पदाची शपथ घेऊन रस्त्यावर उतरला होता. त्यांच्या मनाची काय घालमेल असेल, कोणत्याही कवीला, लेखकाला किंवा छायाचित्रकाराला ती अवस्था चित्रित करता येणे शक्य नव्हते. आयुष्यातले काही क्षण व्यक्तिगत जीवनातील दु:खे पचवून टाकत देशाकरिता उभे राहावे लागते.   नियती कशी क्रूर असते बघा.. 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिराजींच्या सुरक्षारक्षकांनी  त्यांची हत्या केल्यावर इंदिराजींच्या पार्थिवाला भडाग्नी देण्याचे दु:खद काम राजीवजींना करावे लागले. त्यावेळी लहानगा राहुल राजीव गांधींना बिलगल्याची छायाचित्रे पाहताना या देशातल्या लोकांची मने हेलावून गेली होती आणि अवघ्या सात वर्षानी राजीवजींच्या भीषण हत्येनंतर त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी देताना अवघ्या 18 वर्षाचा राहुल कोणालाही बिलगू शकत नव्हता.. आज 21 मे 1991 आठवते आहे. बघता बघता 29 वर्षे झाली. रात्री 10:40ची वेळ होतीे. राजीव गांधी निवडणूक दौ-यावर होते. श्रीपेरुमेंदूरला जाताना ते विमानात बसतात. विमानात बिघाड होतो. खाली उतरतात. विमानतळाच्या बाहेर जातात. तेवढयात विमान सुरू होते. त्यांना परत बोलावून आणले जाते. जणू मृत्यूनेच त्यांना परत बोलावले आहे आणि ते त्या सभेच्या ठिकाणी जातात. तिथे शिवरासन, नलिनी, धानू त्यांची वाट बघत उभे आहेत. सुरक्षारक्षक आहेत. आदल्या दिवशी व्ही. पी. सिंग यांची सभा झाली असताना त्यांना तसाच हार घालणारी धानू आणि नलिनी दुस-या दिवशी पुन्हा या नेत्याला हार घालायला कशा येतात, अशी शंका सुरक्षारक्षकांना येणे गरजेचे असताना, त्यांनी आणि तेथील इन्स्पेक्टर अनसुया यांनी मेटल डिटेक्टरमधून तपासणी न करता या तिघांना राजीव गांधींपर्यंत जाऊ कसे दिले, या प्रश्‍नाचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. राजीवजींच्या हत्येच्या चौकशीचा अहवाल आला. त्या अहवालातही या प्रश्‍नाचे उत्तर नाही. काँग्रेसच्या ज्या सभेच्या व्यासपीठावरून राजीव गांधी गर्दीत मिसळण्याकरिता खाली उतरले त्यावेळी त्यांच्यासोबत एकही सुरक्षारक्षक नव्हता. व्यासपीठावरचे काँग्रेसचे नेते के. मुपनार आणि जयंती नटराजन हे राजीव गांधींना सोबत करीत नाहीत. व्यासपीठावरच उभे राहतात. अतिशय हस-या प्रसन्न चेह-याने समोर हार घालायला येणा-या ‘त्या’ खलनायिका धानूचे सुहास्य वदनाने राजीवजी स्वागत करीत आहेत. त्यांना काय कल्पना की, ही  समोर हार घेऊन उभी असलेली मुलगी आपला काळ बनून आपल्यासमोर उभी आहे! अवघी दहा मिनिटे गेली आहेत आणि प्रचंड स्फोट झाला आहे. राजीवजींच्या देहाची चाळण झाली आहे. इंदिराजींच्या हत्येवेळी त्यांच्या देहाची चाळण झाली होती; पण त्यांचा चेहरा प्रसन्न होता. इथे राजीवजी वाकले, गळयात हार घालून घेतला आणि शक्तीशाली मानवी बॉम्बस्फोटाने त्यांच्या चेह-याच्या, देहाच्या चिंधडया उडाल्या. धानूही त्यात मारली गेली. पण कटाचे सूत्रधार शिवरासन आणि नलिनी कित्येक वर्षे जेलमध्ये राहिले आणि या गांधी घराण्याने त्यांना माफी द्यावी, इतकी उदारताही दाखवली. एखाद्या कादंबरीचे कथानक शोभावे, तशी ही  राजीव यांच्या हत्येची भयानक कथा आहे. 30 ऑक्टोबर 1984 रोजी ओदिशामध्ये भाषण करताना इंदिराजी तर जाहीरपणे म्हणाल्या होत्या. ‘आज मैं जीवित हूँ.. शायद कल नही रहूँगी.. लेकीन मेरे खून का कतरा कतरा देश को एक रखने में मदत करेगा..’ इंदिराजींच्या बलिदानानंतर तरुण वयात काँग्रेसला प्रथमच 3/4 बहुमत मिळवून देऊन सत्तेवर आलेले राजीव गांधी यांनी या देशातल्या 18 वर्षाच्या तरुणांना मताचा अधिकार पहिल्यांदा दिला आणि त्याच तरुणांची पुढची पिढी राजीवजींच्या संगणकीय क्रांतीची आज दूत बनलेली आहे. या देशाला आधुनिक जगाबरोबर घेऊन जाण्याचा फार मोठा प्रयत्न राजीवजींनीच केला त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी म्हणवणारे राजीवजींचे अनमोल बलिदान विसरुन जातात हि निष्ठूरता…आपमतलबी स्वार्थीपणा की अज्ञान…?


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!