दैनिक स्थैर्य | दि. ८ मार्च २०२३ | फलटण |
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोळकी गावातील आदर्श मातांचा सत्कार करण्याचे कोळकी ग्रामपंचायतीच्या वतीने निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार बुधवार, ८ मार्च रोजी कोळकी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श मातांचा सत्कार करण्यात आला.
कोळकीच्या आदर्श मातांचा सत्कार करताना ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सपना कोरडे, उपसरपंच श्री. विकास नाळे, ग्रामविकास आधिकारी साळुंखे आण्णा तसेच कोळकी ग्रामपंचायतीचे सदस्य आणि महिला सदस्या व कोळकी गावातील महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ग्रामपंचायतीचे आदर्श मातांचा सत्कार केल्यानंतर या मातांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. या सत्काराला उत्तर देताना ग्रामपंचायतीने केलेला सत्कार आम्ही कधीही विसरणार नाही, असे भावनिक उद्गार सत्कारमूर्ती मातांनी काढले.
या कार्यक्रमावेळी गावातील महिलांची मोफत आरोग्य तपासणीही करण्यात आली. यावेळी महिलांना आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याचेही मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामपंचायतीने राबविलेल्या या उपक्रमाचे कोळकी ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.