दैनिक स्थैर्य | दि. ६ एप्रिल २०२३ | फलटण |
सोमंथळी, ता. फलटण येथील दक्षिणमुखी स्वयंभू श्री हनुमान मंदिर हे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या मारूतीला ‘नवश्या मारूती’ म्हणूनही संबोधले जाते. हनुमान जयंती उत्सवानिमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुवारी पहाटे ४ ते ६ वाजण्याच्या दरम्यान हनुमान जन्मकाळनिमित्त स्थानिक भजनी मंडळांचा संगीत भजन सोहळा संपन्न झाला. ६.१० वाजता गुलाल, पुष्पांची उधळण करून हनुमान जन्मोत्सव संपन्न झाला. सकाळी ९ ते ११ या वेळेमध्ये ह.भ.प. चैतन्य महाराज बारवकर इंदापूर यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन झाले. दुपारी ३ ते ६ कावडी काट्यांची मिरवणूक हालगी ढोल-ताशांच्या गजरात, बँजो फटाक्याची आतिषबाजी करत मिरवणूक कार्यक्रम संपन्न झाला.
सायंकाळी ७ ते ११ श्रींचा छबिना मिरवणूक कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. तसेच करमणुकीचा कार्यक्रम संपन्न झाला.
मारूती देवस्थान ट्रस्ट सोमंथळीचे अध्यक्ष व विश्वस्त कमिटी व यात्रा कमिटी यांच्या नियोजनामुळे खेळीमेळीत कार्यक्रम संपन्न झाले. नवसाला पावणारे हे जागृत देवस्थान आहे. हनुमान जयंतीला हनुमानाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भक्तांची येथे प्रचंड गर्दी असते.