आषाढी निमित्त गायक ‘जयदीप बगवाडकर’नं विठुरायाला ‘वारी नाही रे’ या गाण्याने घातली भावनिक साद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२१ । फलटण ।  संगीत क्षेत्रात कायम नाविन्यपूर्ण प्रयोग करणारा प्रसिद्ध गायक ’जयदीप बगवाडकर’नं आषाढी एकादशीचं औचित्य साधत ’वारी नाही रे’ या गाण्यामार्फत विठुरायाला भावनिक साद घातली आहे.

’अक्षरा क्रिएशन्स’ निर्मित या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार ’अश्‍विनी शेंडे’ हीने लिहीले आहेत. या गाण्याचे संगीत ’श्रेयस जोशी’ आणि संगीत संयोजन ’प्रणव हरिदास’ यांनी केले आहे.

गायक जयदीप बगवाडकर ’वारी नाही रे’ या गाण्याविषयी सांगतो, ’’एखादी चाल जेव्हा मनाला भिडते, तेव्हा आतून काहीतरी जाणवतं, तेच वारी नाही रे हे गाणं पहिल्यांदा ऐकल्यावर झालं. अश्‍विनी शेंडे हिने त्यावर सुरेख शब्दांचा साज चढवला आणि गाणं पूर्णत्वाला आलं. तसेच या गाण्याला संगीतकार श्रेयस जोशी याची अजोड साथ लाभली. गाणं गाताना समोर फक्त वारी दिसत होती. मोकळे रस्ते, धुसरसा पाऊस आणि सा-यांच्या मुखात माऊली नाम. एक अत्यंत खोल अनुभव होता आणि नेहमी प्रमाणे विठ्ठलाने तो माझ्याकडून पूर्ण करून घेतला. मनात खूप समाधान आहे, व त्याहीपेक्षा वारी पुन्हा कधी होणार हा प्रश्‍न सुद्धा मनाला भेडसावत आहे. पांडुरंगा चरणी एकच प्रार्थना पुढच्या वर्षी तरी वारी व्हावी.’’

आजवर जयदीपने मराठी आणि हिंदी भाषेत अनेक गाणी गायली आहेत. तसेच त्याने अनेक रिलिटी शोज सुद्धा केलेत. संगीत क्षेत्रातील नामांकित दिग्गज, गायिका श्रेया घोषाल, वैशाली सामंत, बेला शेंडे तसेच गायक अवधूत गुप्ते यांच्यासोबत अनेक स्टेज शोज केले आहेत. तसेच ’मुंबई – पुणे – मुंबई 3’ या सिनेमातील प्रसिद्ध गाणं ’कुणी येणारं गं’ या गाण्याचे ते गायक आहेत.


Back to top button
Don`t copy text!