‘रयत’च्या वतीने स्व. अजितदादांना श्रद्धांजली


सातारा : स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन प्रसंगी चंद्रकांत दळवी. त्यावेळी डॉ. अनिल पाटील, रविंद्र पवार, संजीव पाटील, डॉ. ज्ञानदेव मस्के व इतर.

स्थैर्य, 13 फेब्रुवारी, सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सातारा येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ना. स्व. अजितदादा पवारसाहेब यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नुकतेच शोकसभेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे संघटक मा. डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ऍड. रविंद्र पवार, मध्य विभागाचे विभागीय चेअरमन संजीव पाटील, कर्मवीर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ज्ञानदेव मस्के, उच्चशिक्षण सहसचिव शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव (ऑडिट) डॉ.राजेंद्र मोरे, सहसचिव (माध्यमिक) बंडू पवार आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.

चंद्रकांत दळवी म्हणाले, दादांच्या दुर्दैवी, दुःखद अपघाती निधनाने रयत शिक्षण संस्थेवर, महाराष्ट्रावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंत्यविधीला जी काही गर्दी जमली होती हे पाहून दादांचे राजकारणातील खरे काम आणि लोकांचे प्रेम दिसून आले. यावरून दादा हा ’कामाचा माणूस आहे’ हे सिद्ध झाले. सकाळी सहा वाजता अपॉइंटमेंट देणारा नेता मी आज अखेर पहिला नाही. दादा हे पुण्याचे पालकमंत्री असताना त्यांनी अनेक लोकांची कायदेशीररित्या रखडलेली कामे पूर्ण केली. दादांची कामाची पद्धत सगळ्यांना आवडत होती. 1996 मध्ये दादा रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य् झाले आणि 2005 मध्ये मॅनेजिंग कॉन्सिल सदस्य झाले. गेली 25-30 वर्ष खर्‍या अर्थाने संस्था निश्चिंत होती, पण आता संस्था पोरकी झाल्यासारखे वाटत आहे.

डॉ. अनिल पाटील म्हणाले, दादांच्या निधनाने रयत शिक्षण संस्थेची अपरिमित हानी झाली आहे. 20-25 वर्षापूर्वी दादांचा आणि आमचा सबंध आला. दादा अर्थमंत्री असताना त्यांनी कुंभोज येथील अण्णा-वहिनींच्या स्मारकासाठी पाच कोटी रुपये मंजूर केले; पण हे कधी मिळतील, केव्हा मिळतील असे वाटत असतानाच दि.09 मे च्या कार्यक्रमात तीन कोटींचा चेक दिला. दादांची रयतेसाठी असलेली जिद्द पाहून खूप आनंद झाला. रयतच्या प्रत्येक प्रलंबित प्रश्नासाठी ’दादा’ हे उत्तर होते.

सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे, ऍड. रविंद्र पवार, माजी प्र. कुलगुरू अशोक भोईटे, मा. डी. बी. पाटील, मा. एस. डी. कदम आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन मा. ऍड.भगीरथ शिंदे ,मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. रामशेठ ठाकूर साहेब, डॉ. एम. बी. शेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शोकसभेस उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या., सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. अत्यंत शोकपूर्ण वातावरणात ही शोकसभा संपन्न झाली. शोकसभेस सातारा शहरातील सर्व स्थानिक शाखाप्रमुख, जनरल बॉडी सदस्य, लाईफ मेंबर, लाईफ वर्कर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!