भाजपाच्या वतीने सातारा जिल्ह्यात ‘मतदार चेतना अभियान’ सुरू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑगस्ट २०२३ | सातारा |
भारतीय जनता पार्टीच्या वतीने सातारा जिल्ह्यामध्ये मतदार यादीतील नावांची पडताळणी करण्यासाठी ‘मतदार चेतना अभियान’ राबवले जात आहे. मतदाराचा मृत्यू झाला असल्यास, मतदाराचे निवासस्थान बदलल्यास त्याची दुरूस्ती मतदार यादीत करण्यासाठी फॉर्म नं. ६ भरावा लागतो. मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी प्रशासनास सहकार्य म्हणून ही योजना राबविण्यात येत असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी उपस्थित होते.

धैर्यशील कदम पुढे म्हणाले की, अभियानात अंतर्गत नवीन मतदारांची नोंदणी, नावांची, पत्त्यांची दुरूस्ती, बोगस मतदारांची नावे वगळणे यासाठी हे अभियान सुरू केले जात असून मतदारांना आवश्यक सहकार्य करणे आणि मतदार यादी अद्ययावत करून ही मोहीम पूर्ण करण्याकरीता प्रशासकीय यंत्रणेचे सहकार्य घेणे, अशा विविध टप्प्यात कार्यक्रम राबवले जाणार आहेत. मतदारयादी अचूक व अद्यावत नसल्यास, मतदार यादीत घोळ असल्यास त्याचा परिणाम निवडणूक प्रक्रियेवर होतो. मतदारांची नावे चुकीची असणे, पत्ते चुकीचे असणे, या त्रुटींमुळे हक्काचे मतदान होऊ शकत नाही. त्याकरिता १८ वर्षे पूर्ण असलेल्या युवकांचे नाव मतदारयादीत समाविष्ट करणे, त्यासाठी फॉर्म क्रमांक ६ चा वापर करणे, सहा ब फॉर्मच्या माध्यमातून मतदार यादी दुरूस्त करणे, एखाद्या मतदाराच्या नावाबाबत शंका असल्यास फॉर्म क्रमांक ७ द्वारे त्याचा आक्षेप घेणे आणि प्रशासकीय यंत्रणेकडे अर्ज करणे इ. प्रक्रिया राबविली जाणार आहे.

कदम पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मंडलनिहाय आणि बूथनिहाय आमचे संपर्क दौरे सुरू आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची प्रचंड ताकद आहे, यासाठी आगामी काळात पक्ष मजबूत करण्यासाठी संपर्क दौर्‍यांना गती दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये २०२४ चा खासदार भाजपचा असेल, असा विश्वास व्यक्त करत उमेदवार निश्चिती भाजपची केंद्रीय समिती घेईल, असे कदम यांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्ह्यामध्ये महापुरूषांच्या संदर्भाने आपत्तीजनक पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत, या विषयावर बोलताना कदम म्हणाले, या प्रकरणाची गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. सातारा जिल्ह्याच्या सायबर सेलसाठी विशेष तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. या प्रकरणातील मास्टरमाइंड सातारा पोलीस निश्चित शोधून काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हणबरवाडी येथील जलसिंचन योजनेसाठी तत्कालीन पालकमंत्र्यांना रस्त्यावर उतरून उपोषण करण्याची वेळ येते, मात्र ते पालकमंत्री राष्ट्रवादीचे दहा वर्षे आमदार होते. अडीच वर्ष सहकार मंत्री होते. त्यावेळी त्यांनी ती योजना का पूर्ण केली नाही आणि आता भाजपच्या माध्यमातून हणबरवाडी येथील जलसिंचन योजना मार्गी लागत असताना आता ते आपणच केल्याचे दाखवण्यासाठी ‘रास्ता रोको’चा घाट घातला जात आहे. हा राजकीय दुटप्पीपणा लोकांच्या लक्षात येत आहे, असा राजकीय टोला धैर्यशील कदम यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांचे नाव न घेता लगावला.


Back to top button
Don`t copy text!