दैनिक स्थैर्य । दि. २३ डिसेंबर २०२१ । फलटण । आदरुंड, ता. फलटण येथील ओंकार गिरीगोसावी या तरुणाने अवघ्या ८ मिनिटे २१ सेकंदात हत्ती घाट सर करुन नवा विक्रम प्रस्थापित केला असून त्याच्या या कामगिरीची नोंद हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये करण्यात आली आहे.
ओंकारच्या या कामगिरीचे विविध स्तरावरुन कौतुक आणि अभिनंदन होत आहे. सातारा जिल्ह्याच्या पूर्व टोकाला माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर हे शंभू महादेवाचे पुरातन मंदिर उंच डोंगरावर वसले आहे. हा डोंगर पार करण्यासाठी हत्ती घाट आणि मुंगी घाट असे दोन मार्ग आहेत. त्यातील हत्ती घाटाची उंची सुमारे १८०० ते २२०० मीटर आहे.
वेदात्री व्हेंचर्स एल एल पी चे संतोष गुरव यांनी ओंकार याचे कौतुक करुन या कामगिरीबद्दल संस्थेचे प्रमाणपत्र देवून त्याचे अभिनंदन केले आहे. ओंकारच्या पुढील वाटचालीसाठी आर्थिक मदतीसह शुभेच्छा देत इतरांना मदतीचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमास वेदात्री व्हेंचर्स एल एल पी चे संतोष गुरव यांच्या समवेत समाधान क्षीरसागर, विजयकुमार क्षीरसागर, दत्तात्रय शिंदे, दीपक यशवंत, प्रमोद शेकोकार, हाय रेंज बुकचे ऑडिटर अजित कर्णे, नॅशनल स्पोर्ट्सचे सागर पिसे आदि मान्यवर उपस्थित होते.